दीपोत्सवात उजळला पंचगंगा घाट, पणत्यांचे तेज : रांगोळीचा गालीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:18 PM2019-11-13T14:18:07+5:302019-11-13T14:22:03+5:30

दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Panchganga Ghat lit at Deepotsav, the glory of women: Rangoli's abusive | दीपोत्सवात उजळला पंचगंगा घाट, पणत्यांचे तेज : रांगोळीचा गालीचा

दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, विद्युत रोषणाई, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. पहाटेच्या निरव अंधाराला भेदून प्रज्वलित झालेल्या हजारो दिव्यांनी या प्रकाशोत्सवाची सांगता झाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देदीपोत्सवात उजळला पंचगंगा घाटपणत्यांचे तेज : रांगोळीचा गालीचा

कोल्हापूर : पहाटेच्या निरव अंधाराला भेदून कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीघाटावर प्रज्वलित झालेल्या हजारो दिव्यांनी प्रकाशोत्सवाची सांगता झाली. दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवमुद्रा प्रतिष्ठान, संदीप देसाई सोशल फाउंडेशनच्या वतीने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

वसुबारसने सुरू झालेल्या दिवाळीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. या दिवशी जलाशय तसेच मंदिरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट म्हणजे नैसर्गिक, धार्मिक अधिष्ठान असलेले विलोभनीय ठिकाण. येथे पौर्णिमेच्या पहाटे होणारा दीपोत्सव म्हणजे अलौकिक सोहळा.

हा आविष्कार अनुभविण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी पहाटे सहकुटुंब हजेरी लावली. दीपोत्सवाची वेळ पहाटे चारची असली तरी त्याची तयारी सोमवारी रात्रीपासूनच सुरू झाली होती. विविध व्यक्ती, संस्था, संघटनांकडून नदीघाट परिसराला सजविण्यात येत होते. रंगावलीकार विविध विषयांनुरूप रांगोळी रेखाटण्यात गुंतले होते. कुणी संस्कारभारती, कुणी ठिपक्यांची, कुणी फुलांची, तर कुणी विशिष्ट थीमनुसार रंगावली साकारत होता.

सजावटीची लगबग संपल्यानंतर पहाटे चार वाजता दीपोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी पंचगंगेची विधीवत पूजा झाली. ‘हर हर महादेव’च्या गजरात स्नानाचा सोहळाही सजला आणि दीपोत्सवाला प्रारंभ झाला. दरम्यान, घाटावरील पायऱ्या, समाधी मंदिरेही दिव्यांच्या मंद प्रकाशाने आणि विद्युत रोषणाईने झळाळून निघाली.

दिव्यांच्या प्रकाशासोबतच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ऐतिहासिक शिवाजी पुलावर लेसर शो लावण्यात आला होता. पहाटेच्या शांततेत हा दिव्यांच्या मंद प्र्रकाशाचा सोहळा साजरा होत होता.

घाटावरील ही मंदिरे, दीपमाळा आपलेच सजलेले रूप जणू पाण्यात प्रतिबिंबाच्या माध्यमातून पाहत होते. यावेळी नदीघाट परिसर नागरिकांनी फुलून गेला. अनेक महिला, मुली पणत्या घेऊन या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. उगवतीच्या सूर्याच्या साक्षीने सकाळी सातपर्यंत कोल्हापूरकरांचा हा उत्सव सहकुटुंब सुरू राहिला.

या सुंदर सोहळ्याला गीतसंगीताची साथ लाभली. अंतरंग प्रस्तुत महेश हिरेमठ यांच्या मैफलीबरोबरच यंदा कराओके मैफलीचा आनंदही अनेक कोल्हापूरकरांनी घेतला. विविध संस्था, संघटनांतर्फे यावेळी दुधाचे वाटप झाले.

नगरसेवक संभाजी जाधव, पृथ्वीराज महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नेपोलियन सोनुले, आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा सजला. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे दीपक देसाई, अक्षय मोरे, अवधूत कोळी, प्रवीण चौगले, अविनाश साळोखे, मयूर गवळी, अनिल शिंदे, ऋतुराज सरनोबत, आदींनी संयोजन केले.

अखंड भारताचा नारा

कलेच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा यंदाही दीपोत्सवात सुरू राहिली. यावेळी कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या संस्कृतीची ओळख तर करून दिलीच; पण अयोध्येतील रामजन्मभूमी, अखंड भारत, मोबाईल व ड्रायव्हिंग एकाचवेळी नको, वाढती बेरोजगारी, छत्रपती शंभूराजेंची शिवपूजा, कचरा व्यवस्थापन, दिल का दरिया अशा विविध विषयांवर भाष्य केले. श्री अंबाबाई, गणरायाच्या विविध प्रतिकृती आणि फुलांची आरासही मन आकर्षून घेत होती.

सेल्फी, फोटोसेशन

या दीपोत्सवात कोल्हापूरकर सहकुटुंब सहभागी झाले होते. महिला व मुली पंचगंगेच्या काठावर उभे राहून पणत्यांसोबत आपली सेल्फी काढत होत्या. याशिवाय सजलेल्या सुरेख रांगोळ्या, आकाशाात फटाक्यांची आतषबाजी, दुसरीकडे लेसर शो आणि पणत्यांचा मंद प्रकाश आणि या सगळ्यांचे प्रतिबिंब उमटणारे पंचगंगेचे पात्र टिपण्यासाठी सगळ्यांचे मोबाईल सरसावले.

 

 

Web Title: Panchganga Ghat lit at Deepotsav, the glory of women: Rangoli's abusive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.