कांदा महागला, फळांनी बाजार फुलला : भाजीपाल्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:45 PM2019-09-09T14:45:34+5:302019-09-09T14:47:19+5:30

कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.

Onions are expensive, fruits bloom on the market | कांदा महागला, फळांनी बाजार फुलला : भाजीपाल्याची आवक वाढली

कोल्हापुरात लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत होती. अननसाचे असे ढीग जागोजागी दृष्टीस पडत होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकांदा महागला, फळांनी बाजार फुललासाप्ताहिक बाजारभाव : भाजीपाल्याची आवक वाढली

कोल्हापूर : कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.

रविवारी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत फेरफटका मारला असता, बाजार फळांनी आणि भाज्यांनी फुललेला दिसला. पावसानेही दिवसभर उघडीप दिल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. महापूर व अतिवृष्टीमुळे खरिपातील कांद्याचे पीक कुजल्याने गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या नवीन कांद्याची आवक पूर्णपणे थंडावली आहे.

परिणामी, साठवणुकीच्या कांद्यावरच बाजाराच्या मागणीची पूर्तता केली जात आहे. गेल्या आठवड्यात २५ रुपये असणारा दर आता ३५ ते ४० रुपये किलोवर पोहोचला आहे. शिवाय कांद्याची प्रतही खालावलेलीच आहे. आल्याचे दरही अजून चढेच आहेत. १६० रुपये किलो दर आहे. लिंबूचे दरही वाढून आहेत.

अजूनही १० रुपयांना दोन ते तीन लिंबू अशीच विक्री सुरू आहे.
कोथिंबिरीचे दर कमी झाले आहे. १० ते १५ रुपयांना पेंढी मिळत आहे. बाजार समितीतही ३४ हजार पेंढ्यांची आवक झाली आहे. पालेभाज्या मात्र बाजारात दुर्मीळ आहेत.

मेथीचे कुठेतरी दर्शन होत असून पेंढीचा दर २० रुपये आहे. कांदापात, शेपू, पालक १० रुपये पेंढी दर आहे. हिरवी मिरची ३० ते ४० रुपये किलो आहे. वांगी ५० रुपये किलो असून उर्वरित सर्व फळभाज्याही ५० ते ६० रुपये किलो अशाच आहेत.

साखरेचे दर वाढत आहेत. किलोचा दर ३८ रुपयांवर गेला आहे. सणासुदीला नारळाची मागणी असल्याने त्याचाही दर नगाला २० ते ३५ रुपये आहे. उपवासासाठी शाबू व वरी ९० रुपये किलो आहे. तांदूळ २५ ते ६० रुपये, तर ज्वारी २८ ते ५२ रुपये असा दर कायम आहे. गहू दर ३० ते ३५ रुपये आहे. खाद्यतेलांमध्ये वाढ दिसत आहे. सरकी ९० रुपये, शेंगतेल १३५, सोयाबीन ९५, सूर्यफूल १२५ रुपये दर झाला आहे. मूग, मसूर, हरभराडाळ ६० ते ७० रुपयांपर्यंत आहे.

सफरचंदांचे ढीग

बाजारात सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सिमला येथून इंडियन सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजार लालभडक झाला आहे दरही ४० ते ८० रुपये किलो असे आहेत. अननसांची आवक अजून कायम आहे. केळीची आवक वाढली असून दरही ३० ते ४० रुपये डझन आहेत. डाळींब ३० ते ५० रुपये किलो आहेत. आकाराने मोठे असलेले थायलंडचे पेरूही बाजारात दिसत असून नगाची किंमत ३० ते ४० रुपये आहे.

 

 

Web Title: Onions are expensive, fruits bloom on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.