Sugarcane Rate: तोडगा निघालाच नाही; नेमका तिढा काय?, बैठकीत काय झालं..वाचा; गुरुवारी पालकमंत्री घेणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:33 IST2025-11-04T17:32:39+5:302025-11-04T17:33:12+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : शेतकऱ्यांनीही संयम पाळून कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : ऊसदरासंदर्भातजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या संयुक्त बैठकीत तब्बल पावणेतीन तास चर्चा झाली. मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. गुरुवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर या संदर्भात बैठक घेणार आहेत.
कायद्यानुसार शेतकऱ्यांना विहीत कालावधीत एफआरपीप्रमाणे पैसे देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. त्याचे उल्लघंन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिला.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, अद्याप मागील हंगामातील एफआरपी न दिलेल्या आठ कारखान्यांनी तातडीने निर्णय घ्यावा. त्याचबरोबर ऊस वजन काट्याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. संबंधित विभागाला अचानक काटे तपासण्याच्या सूचना देणार आहे. त्याचबरोबर खुशालीला कारखान्यांनी चाप लावावा.
वाचा : ऊस दराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत धुराडी पेटू देणार नाही, राजू शेट्टींनी दिला इशारा
बैठकीला पोलिस अधीक्षक योगेशकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक साखर सहसंचालक सरिता डोंगरे, भगवान काटे, भाई भारत पाटील, बाबासाहेब देवकर, ॲड. माणिक शिंदे यांच्यासह साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, अधिकारी उपस्थित होते.
कोण काय म्हणाले....
- प्रा. जालंदर पाटील : साखर कारखान्यांचा खोटे ताळेबंद तयार करणाऱ्या लेखापरीक्षकांवर गुन्हे दाखल करा
- शिवाजी माने : गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या कपातील विरोध असून ‘आरएसएफ’नुसार हिशोब दिला नसताना गाळप परवाना दिला कसा ? :
- सावकार मादनाईक : एकाच तालुक्यातील उसाचे दोन दर कसे..?
‘राजाराम’, ‘दौलत’कडून खुलासा मागविणार
बैठकीला ‘राजाराम’ व ‘दौलत’ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते, यावरून राजू शेट्टी आक्रमक झाले. त्यांना शेतकऱ्यांची किंमत नसेल तर आम्हाला त्यांच्या दारात जावे लागेल. यावर, संबंधित कारखान्यांकडून खुलासा मागविला जाईल, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
तर शेतकरी व पोलिसांत संघर्ष
प्रशासनाच्या डोळ्यासमोर कायद्याची पायमल्ली कारखानदार करीत असताना त्यांना अभय देता आणि कायद्याने पैसे मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करता, हा कसला तुमचा कायदा ? उच्च न्यायलय व कायद्याचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा विनाकारण तुमच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू होईल, असा इशारा शेट्टी यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन
गेल्या वीस वर्षांत ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक बैठका झाल्या; पण आजच्या बैठकीत मुद्देनिहाय चर्चा घडवून आणल्याबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांचे शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
तिढा काय..?
- मागील हंगामातील थकीत एफआरपी आधी द्या.
- ऊस तोडणी-वाहतूकमध्ये मखलाशी करून एफआरपी चोरी केलेल्या कारखान्यांवर कारवाई करा..
- यंदा कमी एफआरपी जाहीर केलेल्या चार कारखान्यांनी फेरविचार करावा.