कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे नामकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अनेक वर्षांची मागणी पूर्ण; कोल्हापुरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 06:12 PM2018-01-17T18:12:02+5:302018-01-17T18:47:30+5:30

कोल्हापूर येथील विमानतळाचे आता ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण होणार आहे. या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Naming of Kolhapur Airport 'Chhatrapati Rajaram Maharaj'; Decision in Cabinet meeting; Demand for many years; Shout at Kolhapur | कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे नामकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अनेक वर्षांची मागणी पूर्ण; कोल्हापुरात जल्लोष

कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे नामकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अनेक वर्षांची मागणी पूर्ण; कोल्हापुरात जल्लोष

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे नामकरण मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयअनेक वर्षांची मागणी पूर्ण; कोल्हापुरात जल्लोष१९२२ साली राजाराम महाराज यांनी कोल्हापुरात आणले पहिले विमानकोल्हापुरसाठी अभिमानाची बाब, महिन्यात केली वचनपूर्ती : चंद्रकांतदादा पाटील अमल महाडिक यांनी केले पुष्पगुच्छ देवून अभिनंदन भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला साखर-पेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर : येथील विमानतळाचे आता ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण होणार आहे. या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

कोल्हापूर विमानतळ स्थापन करणारे आणि सन १९३९ मध्ये विमानसेवा सुरू करणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळास द्यावे अशी मागणी गेल्या १८ वर्षांपासून राजारामपुरी असोसिएशन, सातत्याने करीत होते.

याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत राज्य सरकारने कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी दिली. आता विमानतळ नामकरणाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.



दरम्यान, व्हीन्स कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर पेढे वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स आणि राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष रणजीत पारेख, सचिव रमेश कार्वेकर,संचालक अनिल पिंजानी, आशिष पाटुकले, राजेंद्र शहा, अमित लोंढे उपस्थित होते.

भाजप कोल्हापूर महानगरतर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती राजाराम महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष जाधव म्हणाले, कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने राज्य सरकारचे आभार मानतो. भाजपा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, कोल्हापूर मध्ये ७५ वर्षापूर्वी राजाराम महाराज यांनी विमानसेवा सुरु केली. त्यांचे कार्य स्मरणात राहण्यासाठी त्यांचे नाव विमानतळास द्यावे हा यामागील उद्देश होता.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला साखर-पेढे वाटून आनंदोत्सव

या कार्यक्रमावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात फुलांनी सजावट केली. त्यासह साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अशोक देसाई, बाबा इंदुलकर, सुभाष रामुगडे, आर.डी.पाटील, सुरेश जरग, गणेश देसाई, अप्पा लाड, बाबा इंदुलकर, विवेक कुलकर्णी, संतोष माळी, भैया शेटके, विजय अग्रवाल, अक्षय मोरे, आसावरी जुगदार, वैशाली पोतदार, सुजाता पाटील, सुजय मेंगाणे उपस्थित होते.
 

अमल महाडिक यांनी केले पुष्पगुच्छ देवून अभिनंदन

कोल्हापूरच्या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव बुधवारी राज्य शासनाने मंत्रीमंडळात केला. महसुल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी महसुलमंत्री  चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

कोल्हापुरसाठी अभिमानाची बाब, महिन्यात केली वचनपूर्ती : चंद्रकांतदादा पाटील 

 भारताला समता आणि समानतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे कार्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेणारे आणि जिल्ह्याच्या विकासाची दूरदृष्टी असणारे छत्रपती राजाराम महाराजांचे नाव कोल्हापूर विमानतळास देण्याचा ठराव आज केला.

छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली असून कोल्हापुरसाठी ही अभिमानची बाब असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याबाबत एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती आणि आज त्याचा मंत्रीमंडळात ठराव करून वचनपूर्ती केल्याचे ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची दखल शासन घेणार असल्याचे १७ डिसेंबर २0१७ मध्ये सांगितले होते. त्यानुसार कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देणार असल्याचे जाहिर केले होते. यासाठी विशेष प्रयत्न करून एक महिन्यात छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्याबाबतच ठराव मंत्रीमंडळात केला. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, राजर्षि शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल भारतीय जनता पक्षानेच घेवून त्यांचा योग्य सन्मान केला आहे.

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना कोल्हापूर रेल्वे स्थानकास राजर्षि शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. भाजपचे जेष्ठ नेते आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा झाला. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळेच छत्रपती राजाराम महाराजांच्या कायार्ची दखल घेत विमानतळास नाव देण्याचा ठराव करण्यात आला. लवकरच केंद्राकडून ही यासाठी मंजूरी मिळण्यासाठी प्रयत्न करू.

राज्य शासनाचे अभिनंदन : ललित गांधी

कोल्हापूरात सर्वप्रथम विमानतळ स्थापन करणारे आणि १९३९ मध्ये विमानसेवा सुरू करणारे दूरदृष्टीचे राजे छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळास द्यावे अशी मागणी राजारामपुरी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती.

या मागणीला मिळालेले यश एक आनंददायी घटना असून राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून आनंद साजरा केला. 

राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानतळ प्राधिकरण आणि विमान वाहतूक मंत्रालयाकडून तत्त्वत: मंजुरी मिळवली होती.

राज्य शासनाने याविषयी ठराव केल्यानंतर केंद्र सरकार प्रक्रिया पूर्ण करेल असे लेखी आश्वासन मिळवले होते. सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी लावून धरली होती. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत: राज्य शासनाला शिफारस करून या मागणीस पाठिंबा दिला होता.

आमदार अमल महाडिक यांनी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला. या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव संमत झाला. खासदार धनंजय महाडिक खासदार, संभाजी राजे तसेच सर्व प्रसार माध्यमांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

राजाराम महाराज यांनी कोल्हापुरात आणले पहिले विमान

सन १९२२ साली राजर्षी शाहू महाराज यांच्या निधनानंतर सत्ता सूत्रे हाती घेतल्यानंतर अपुरी राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्याचा काटेकोर प्रयत्न राजाराम महाराज यांनी केला. त्यामध्ये राधानगरी धरण पूर्ण बांधून घेतले.

बी.टी.कॉलेज निमिर्ती, शांतीकिरण व जयप्रभा स्टुडीओ त्याचबरोबर शालिनी पॅलेस निर्मिती, पुण्यातील शिवस्मारक, कोल्हापूरातील चित्रपटगृह सुरु केले. विमानतळाची स्थापना अशी विकासाभिमुख कामे त्यांनी केली. त्यांनी कोल्हापूरात पहिले विमान आणले. त्यामुळेच गेल्या १७ वर्षांपासून कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी होती. 

राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते, मात्र त्यांचे अपुरे काम पूर्ण करण्याचे कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केले. राजर्षी शाहू महाराजांचे विचार व वारसा त्यांनी पुढे चालविला.

कोल्हापूर संस्थानमध्ये दळणवळण व वाहतुकीच्या दृष्टीने व्यापार वाढीसाठी विमानतळ असावे, या हेतूने उत्तुंग व उल्लेखनीय असे प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केले. १९३0-३५ मध्ये त्यांनी विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी १७0 एकर जमीन विमानतळासाठी संपादित केली.

विमानतळाचे उद्घाटन ४  मे १९४0 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्याच हस्ते झाले. १९७८-७९ मध्ये विमानतळाचे विस्तारीकरण झाले. कोल्हापुरला खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर नेण्याचे आणि जिल्ह्यातील उद्योग, शेती क्षेत्राला विकासाची झेप घेण्यासाठी प्रयत्न  छत्रपती राजाराम महाराजांनी केले.

Web Title: Naming of Kolhapur Airport 'Chhatrapati Rajaram Maharaj'; Decision in Cabinet meeting; Demand for many years; Shout at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.