यड्राव : येथील शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘मल्टीक्रॉप सोलार ड्रायर’ मशीन बनविले आहे. यामुळे साठवून ठेवलेल्या शेतीमालाचे नुकसान होणार नाही. त्याचबरोबर कमी वेळेत व खर्चात मालाच्या दर्जा टिकून राहून पर्यावरणपूरक शेतीमाल सुकवू शकतो असे ड्रायर बनवले आहेत. वेगवेगळ्या शेतीमालाला उपयुक्त ठरेल असे दहा मॉडेल शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहेत. यामुळे रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण अर्थचक्र गती घेणार आहे. फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या सर्वेनुसार देशामध्ये चुकीच्या उत्पादन साठवणूक पध्दतीमुळे ३० टक्के शेतीमालाची नासाडी होते. यामुळे शेतकऱ्यांचे अनेक महिन्यांचे कष्ट, वेळ, पैशाचा अपव्यय होतो. या समस्येवर शरदच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षे संशोधन करुन स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून हे सोलर ड्रायर बनविले आहे.
यामुळे धान्य, भाजीपाला, फळे, हळद, द्राक्ष, आयुर्वेदात उपयुक्त औषधी वनस्पती, खोड, बिया, ड्रायफ्रुटस, मिरची सुकविण्यासाठी याचा उपयोग होतो. सूर्यप्रकाशावर चालणारे यंत्र इतर ड्रायरच्या तुलनेत ४० टक्के कमी किमतीमध्ये उपलब्ध होते. या ड्रायरमुळे पारंपरिक प्रक्रियेच्या तुलनेत निम्म्या वेळेत, कमी जागेत प्रदूषण विरहित शेतमाल सुकवता येतो. तसेच या तंत्रज्ञानामुळे धुळ आणि किटकांमुळे होणारी नासाडी थांबते. यंत्रामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मानांकनानुसार कोणत्याही पोषणतत्वांचा ऱ्हास होत नाही. जो इतर ड्रायरमध्ये होतो. तसेच या यंत्रामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्द्रता, तापमान, ओलावा याची माहिती शेतकऱ्यांना अॅपव्दारे मिळते. हे यंत्र दयालराज पोरे, सुनील पुजारी, अनिस नदाफ, मानतेश पाटील, असिया पेंढारी, राजेंद्र पाटील, श्रद्धा महाडिक, मयुरेश कोरे, अमेय पनदे, अमृत जाधव या विद्यार्थ्यांनी बनविले आहे. त्यासाठी प्रा. अवेसअहमद हुसेनी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे प्रोत्साहन मिळाले.
फोटो - २१०१२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथील शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या 'मल्टीक्रॉप सोलार ड्रायर' सोबत विद्यार्थी.