कारागृहात मोबाईल, गांजा टाकणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 10:38 AM2021-01-07T10:38:12+5:302021-01-07T10:39:36+5:30

Jail Crimenews kolhpaur- कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. चौघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी) या पैलवानाला ताब्यात घेतले.

Mobile, cannabis smuggling gang busted in jail | कारागृहात मोबाईल, गांजा टाकणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

कारागृहात मोबाईल, गांजा टाकणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देचौघांची नावे निष्पन्न : वाहन जप्त; दोन पैलवानांचा समावेशसांगलीच्या दोघांसह, जयसिंगपूर, कोदवडेतील संशयितांचा सहभाग

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून बेकायदेशीरपणे मोबाईल व गांजा फेकणाऱ्या गन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. चौघांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी ऋषिकेश सदाशिव पाटील (रा. कोदवडे, ता. राधानगरी) या पैलवानाला ताब्यात घेतले.

गुन्ह्यातील चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. सीसीटीव्हीच्या मदतीने हा छडा लागला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नावे निष्पन्न झालेले संशयित असे : भिष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र ऊर्फ दाद्या धुमाळ (रा. रेल्वे स्टेशननजीक, जयसिंगपूर), ऋषिकेश सदाशिव पाटील (२५, रा. कोदवडे, ता. राधानगरी, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश, कोल्हापूर).

अधीक्षक बलकवडे म्हणाले, दि. २२ डिसेंबर २०२० रात्री सव्वा वाजता भिष्म्या चव्हाण व राजेंद्र धुमाळ हे दोघे चारचाकी वाहनातून गंगावेशमध्ये आले. तेथील एका तालमीतील ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडे यांना घेऊन कळंबा कारागृहानजीक गेले.

तेथे राजेंद्र धुमाळ याने दहा मोबाईल, गांजा, मोबाईल चार्जर, पेनड्राईव्ह असे तीन गठ्ठे करून कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरुन आत फेकले. चौकशीत पोलिसांनी मंगळवारी गंगावेश येथून ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर हा उलगडा झाला. गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसंनी जप्त केले.

सीसी टीव्हीने काढला वाहनाचा माग

कारागृहात मोबाईलसह गठ्ठे टाकलेल्या गाडीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. शहरातील सेफ सिटीच्या सीसी कॅमेऱ्याचे फुटेज कॅमेऱ्यात गाडीचा नंबर अस्पष्ट दिसल्याने खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घ्यावा लागला. संशयितांची गाडी कोठून कोठे गेली, हे निष्पन्न झाले.

दोन पैलवानांचा सहभाग

कोल्हापुरात पैलवानकी करण्यासाठी राज्यासह परराज्यातूनही येतात. पण काही मोजकेच असे पैलवान गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहेत. त्यातील ऋषिकेश पाटील व जयपाल वाघमोडे हे दोघे पैलवान गंगावेश परिसरातील तालमीत राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलीस नाईक बालाजी पाटील ठरले हिरो

संशयित वाहनाचा तपास करत असताना पोलीस नाईक बालाजी पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात पैलवानकी करणारा ऋषिकेश पाटील याच्या मदतीने जयसिंगपूर व सांगलीतील संशयितांनी येऊन मोबाईल फेकण्याची माहिती पुढे आली. त्यातून हा उलगडा झाला. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो. नि. तानाजी सावंत, सहा. पो. नि. विकास जाधव यांनीही विशेष परिश्रम घेतले.

पाळेमुळे खणून काढणार : बलकवडे

मोक्का कारवाईतील कळंबा कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल (रा. इचलकरंजी) याच्यासाठी मोबाईल आत फेकल्याचे निष्पन्न झाले. संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी गुन्हेगारांची साखळी उघडकीस आणणार असून, कारागृहातील कोणाचा यात सहभाग आहे का? याचीही कसून तपास करून प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Mobile, cannabis smuggling gang busted in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.