जगात साखरेची कमी; भारताला निर्यातीची हमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 05:35 AM2021-01-09T05:35:47+5:302021-01-09T05:35:58+5:30

मागणीपेक्षा उत्पादन कमी होण्याचा अंदाज : साखर उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’

Low sugar in the world; Guarantee of exports to India! | जगात साखरेची कमी; भारताला निर्यातीची हमी!

जगात साखरेची कमी; भारताला निर्यातीची हमी!

Next

चंद्रकांत कित्तुरे
लोकमत न्यूज नेटवर्क 
कोल्हापूर : जगात आगामी दोन वर्षे साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा ५० ते ६० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. ही तूट भरून काढण्याची क्षमता भारताकडे असल्यामुळे देशातील साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.


जगात ब्राझील, भारत, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार प्रमुख साखर उत्पादक देश आहेत. थायलंडमध्ये उसाचे उत्पादन घटले आहे. युरोपियन युनियनमध्येही तशीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे ब्राझीलमध्ये यंदा ऊस कमी असल्याने साखर उत्पादन घटणार आहे. याउलट भारतात मात्र अतिरिक्त साखर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव २७०० रुपये क्विंटलच्या आसपास आहेत. केंद्र सरकारकडून निर्यात अनुदानाची प्रतिटन ६००० रुपये मिळणारी रक्कम विचारात घेता निर्यात साखरेला प्रतिटन सुमारे ३३०० रुपये भाव मिळत आहे. हा भाव वाढता राहण्याची शक्यता लक्षात घेऊनच केंद्राने चालू साखर हंगामासाठी निर्यात अनुदान प्रतिक्वंटल १०४८ वरून ६००० रुपयांवर आणले आहे.

इंडोनेशियाला हवी ३० लाख टन साखर
इंडोनेशिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर आयातदार देश आहे. तेथील साखरेच्या १३ रिफायनरींना कच्ची साखर लागते. या देशाला सध्या तातडीने ३० लाख टन कच्ची साखर हवी आहे. यासाठी त्या देशातील प्रतिनिधी, राष्ट्रीय साखर महासंघ आणि केंद्र सरकारचे अधिकारी यांची मंगळवारी दीड तास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. उच्च दर्जाची गुणवत्ता आणि जवळ असल्याने वाहतूक खर्च कमी यामुळे इंडोनेशिया - भारत यांच्यात लवकरच ३० लाख टन साखर निर्यातीचा करार होण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात साखरेला चांगला भाव मिळत आहे. कच्च्या साखरेला मागणी जादा असल्याने कारखान्यांनी या साखरेचे उत्पादन वाढविले तर ६० लाख टन निर्यातीचे लक्ष्य गाठता येऊ शकेल.
- प्रकाश नाईकनवरे,
व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

ब्राझील आणि थायलंड या दोन पारंपारिक नियातदार देशात साखरेचे उत्पादन घटणार आहे उलट भारतात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. ही अतिरिक्त साखर निर्यात करण्याची मोठी संधी महाराष्ट्रासह देशातील कारखानदारांना मिळणार आहे. 
- विजय औताडे, उद्योगातील तज्ज्ञ

Web Title: Low sugar in the world; Guarantee of exports to India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.