Let us take up the issue of opposition without opposition - P. N. Patil | विरोधकांकडे बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाऊ - पी. एन. पाटील
विरोधकांकडे बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाऊ - पी. एन. पाटील

ठळक मुद्देविरोधकांकडे बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाऊ - पी. एन. पाटीलसत्तारूढ गटाचे एकत्रित ठराव दाखल : पाटील, डोंगळेंची नाराजी दूर करू

कोल्हापूर : मल्टिस्टेटचा ठराव रद्द करण्याची मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती, त्यानुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी ठराव रद्द केला, संचालकांच्या गाड्या बंद केल्या, यापेक्षा आणखी काय इच्छा आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. बिनविरोधसाठी आपण त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाऊ. अशी माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विश्वास पाटील यांची नाराजी दूर करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला; मात्र अरुण डोंगळे का नाराज झाले, हे माहिती नाही, दोघांची नाराजी दूर करू, असेही त्यांनी सांगितले.

सत्तारूढ गटाच्या वतीने सोमवारी सकाळी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात संचालकांनी गेले २५ दिवस गोळा केलेले ठराव आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे सोपविले.

पहिल्यांदा संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी आजरा तालुक्यातील १७८ ठरावांचा गठ्ठा दोन्ही नेत्यांकडे सुपूर्द केला. त्यांच्यापाठोपाठ रणजितसिंह पाटील, अंबरिश घाटगे, अरुण नरके व विश्वास जाधव, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, सदानंद हत्तरकी यांच्यासह हातकणंगले, शिरोळ येथील समर्थकांनी ठराव दिले.

यानंतर आमदार पी. एन. पाटील म्हणाले, सर्वसाधारण सभेवेळी हसन मुश्रीफ यांनी तुम्ही मल्टिस्टेटचा निर्णय मागे घ्या, आम्ही तिकडे येत नसल्याचे सांगितले. त्यानुसार मल्टिस्टेट रद्द केले, संचालकांच्या गाड्या बंद केल्या, आणखी काय इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी आपली चर्चा नाही; मात्र हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा झालेली आहे. बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जाऊ. विश्वास पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला; मात्र अरुण डोंगळे का नाराज आहेत, हे कळले नाही. अजून दोन महिने आहेत, त्यात नाराजी दूर करू.

यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, बजरंग देसाई, ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, आदी उपस्थित होते.

पाटील, डोंगळेंच्या भूमिकेने शक्तिप्रदर्शनातील हवा गेली

मोठ्या प्रमाणात ठराव गोळा करून शक्तिप्रदर्शनातून विरोधकांना ‘हबकी’ डावावर चितपट करायचे नियोजन सत्तारूढ गटाचे होते; मात्र विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी त्यांच्या शक्तिप्रदर्शनातील हवा काढून घेतली. ही अस्वस्थता नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

सरूडकर, देसाई यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी ठराव दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले, गळ्यात भगवे स्कार्प घालून त्यांचे समर्थक आले होते. त्यानंतर धैर्यशील देसाई यांनीही समर्थकांसह शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल केले.

‘पी. एन.’ यांच्या पुढे आपण नाही

आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकारांसमोर भूमिका मांडल्यानंतर महादेवराव महाडिक यांनी बोलावे, असा आग्रह धरण्यात आला; मात्र ‘पी. एन.’ बोलले की पुढे काही बोलायचे नसते’ एवढेच सांगत महाडिक यांनी बोलणे टाळले.

अमल, धनंजय महाडिक फिरकलेच नाहीत

गेल्या पाच वर्षांत ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेसह प्रत्येक घडामोडीत माजी खासदार धनंजय महाडिक व अमल महाडिक सक्रिय असायचे; मात्र ठराव दाखल करताना दोघेही तिकडे फिरकले नाहीत. रूईकर कॉलनी येथे करवीर व हातकणंगलेतील ठराव एकत्रित करून अमल महाडिक यांनी त्यांना ताराबाई पार्क येथे पाठविले.

सात विद्यमान संचालक विरोधात

‘गोकुळ’च्या १७ पैकी ५ विद्यमान संचालकांनी सत्तारूढ गटाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये विश्वास पाटील, अरुण डोंगळे, जयश्री पाटील यांनी तर उघड बंड केले. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, विलास कांबळे यांच्यासह स्वीकृत संचालक रामराजे कुपेकर व शासन नियुक्त संचालक अनिल यादव हेही फिरकले नाहीत.

नवीन लोकांना संधी द्या - नरके

मुख्यमंत्र्यांपासून सर्वच राजकीय पक्षांना ‘गोकुळ’ हवे आहे, सगळे तुटून पडले आहेत, इतका मोठा संघ झाल्याचा आनंद आपणास आहे. राजकारण बाजूला ठेवून शेतकरी हितासाठी युवकांच्या हातात संघ दिला पाहिजे. किमान ३० ते ४० टक्के नवीन संचालक आले पाहिजेत, असे अरुण नरके यांनी सांगितले. आपणास सतेज पाटील यांच्यासह सगळेच नेते बोलवत आहेत, राजकारणात काही सांगता येत नाही. कोण कोठे जाईल हे सांगता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

संचालक मंडळात भाजपला स्थान मिळावे- समरजित घाटगे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘गोकुळ’मध्ये महादेवराव महाडिक यांना साथ देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आज आमचे व रणजितसिंह पाटील यांचे असे १६५ ठराव दिले. संचालक मंडळात भाजपला स्थान मिळावे, अशी अपेक्षा असल्याचे ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले.

 

Web Title: Let us take up the issue of opposition without opposition - P. N. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.