तिळगुळाचा गोडवा जीवनात येऊ दे...- मकरसंक्रांती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:10 PM2020-01-16T13:10:24+5:302020-01-16T13:11:50+5:30

गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला.

Let the sesame seeds come to life ... - Capricorn revolution in excitement | तिळगुळाचा गोडवा जीवनात येऊ दे...- मकरसंक्रांती उत्साहात

तिळगुळाचा गोडवा जीवनात येऊ दे...- मकरसंक्रांती उत्साहात

Next
ठळक मुद्देतिळगुळाचा गोडवा जीवनात येऊ दे.. मकरसंक्रांती उत्साहात

कोल्हापूर : गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने घरोघरी पुरणपोळीचा बेत रंगला; तर दिवसभरात तिळगुळाची देवाणघेवाण करीत नात्यांमधला गोडवा अधिकच वाढला. सणानिमित्त श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.

मकरसंक्रांती म्हणजे दु:खद अनुभवांचा कडवटपणा दूर करून आयुष्यात गुळाचा गोडवा आणण्याचा संदेश देणारा सण. सूर्याचा मकर राशीत प्रवेश... थंडीच्या दिवसांत पोषक, आरोग्यदायी अन्नाचे सेवन करायला लावणारा आणि दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल देणारा हा दिवस. दोन दिवसांचा हा उत्सव. भोगीला बाजरीची भाकरी, रानभाज्यांचे सेवन आणि संक्रांतीला पुरणपोळीचे मिष्टान्न भोजन असा हा संयोग साधत बुधवारी कोल्हापूरकरांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

सकाळपासूनच घरोघरी सणाची लगबग सुरू होती. घरादाराची स्वच्छता झाली. अंगणात सप्तरंगांची रांगोळी सजली. देवदेवतांचे पूजन झाले. त्यानंतर सुवासिनींनी औसापूजन केले. पाच सुगड्यांना रंगवून त्यात ऊस, बोरे, गाजर, शेंग हे पूजासाहित्य घालून या सुगड्यांचे पूजन करण्यात आले. घराघरांत पुरणपोळीचा दरवळ सुटला.

या दिवशी काळे कपडे परिधान केले जातात. महिला-मुलींनी काळ्या साड्या, कुर्तीज, वनपीसला प्राधान्य दिले. पुरुषांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. यानंतर सर्वांनी एकमेकांना तिळगूळ देत ‘तिळगूळ घ्या... गोड बोला’चा संदेश दिला.

सणाच्या या गोडव्याने सगळ्यांचा दिवस आनंदमयी गेला. सणानिमित्ताने अनेक शाळांमध्ये तिळगूळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक कपडे घातले होते. महाविद्यालयांमध्ये ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा करण्यात आला. दिवसभर फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवर शुभेच्छा संदेश पाठविले जात होते.

हलव्याचे दागिने... बोरन्हाणे अन् हळदी-कुंकू

मकरसंक्रांतीला पाच वर्षांच्या आतील बालकांना बोरन्हाणे घातले जाते. बालकांना हलव्याचे दागिने घातले जातात. बोरे, ऊस, गाजर, तिळगूळ, चिरमुरे एकत्र करून मापट्याने ते मिश्रण बालकांच्या डोक्यावरून घातले जाते. नंतर हे सगळे बच्चेकंपनीला खायला दिले जाते.

नवविवाहित सुवासिनींनाही हौसेने हलव्याचे दागिने घालून तिचे औक्षण केले जाते. घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रंगतो. वाण म्हणून घरगुती वापराचे साहित्य दिले जाते. रथसप्तमीपर्यंत हा सोहळा रंगतो.
 

 

Web Title: Let the sesame seeds come to life ... - Capricorn revolution in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.