विधान परिषद निवडणूक : महादेवराव महाडिकही झाले होते बिनविरोध, आतापर्यंत काँग्रेसचीच विजयी पताका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 11:22 AM2021-11-27T11:22:32+5:302021-11-27T12:35:16+5:30

विधान परिषदेचा हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून एकूण नऊ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी पाच वेळा त्या बिनविरोध झाल्या व चार वेळा प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे.

Legislative Council Election Mahadevrao Mahadik was also unopposed | विधान परिषद निवडणूक : महादेवराव महाडिकही झाले होते बिनविरोध, आतापर्यंत काँग्रेसचीच विजयी पताका

विधान परिषद निवडणूक : महादेवराव महाडिकही झाले होते बिनविरोध, आतापर्यंत काँग्रेसचीच विजयी पताका

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे देखील यापूर्वी काँग्रेसच्याच चिन्हांवर २००३ मध्ये बिनविरोध निवडून आले होते. फक्त या दोन्ही निवडणुकीतील फरक इतकाच आहे, की महाडिक यांच्या विरोधात विरोधक प्रबळ नव्हता व या निवडणुकीत तो प्रबळ असतानाही ती बिनविरोध होत आहे हेच त्यातील विशेष म्हणावे लागेल. आणखी एक विशेष म्हणजे आतापर्यंत काँग्रेसचाच उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला आहे.

विधान परिषदेचा हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून एकूण नऊ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी पाच वेळा त्या बिनविरोध झाल्या व चार वेळा प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे. मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर पहिल्या दोन टर्मला काँग्रेसचे सदाशिवराव शिंदे हे बिनविरोध निवडून आले. त्या वेळी कोल्हापूर-सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संघ असा एकत्रित मतदारसंघ होता. वसंतदादा पाटील यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांचे राहणीमान एकदम साधे होते. आमदार म्हणून त्यांनी कधीच रुबाब मिरवला नाही. उत्तरेश्वर पेठेतील राजमाता गर्ल्स हायस्कूलजवळ ते भाड्याच्या घरात राहत होते. मेजर (निवृत्त) संजय शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव धारवाडे यांची बिनविरोध निवड झाली. समाजासाठी धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी धारवाडे यांना संधी दिली.

त्यांच्यानंतर इचलकरंजीतील काँग्रेसचे कार्यकर्ते अशोकराव जांभळे यांनी १९९१ ला निवडणूक लढवली. बाळासाहेब माने यांचे ते कार्यकर्ते. या लढतीत त्यांना १४७ मते पडली. जनता पक्षाचे मनोहर माने यांना ५० हून अधिक मते मिळाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार नव्हते. त्यामुळे मतदारसंख्या मर्यादित होती. म्हणजे साधारणत: १९९१ पर्यंत या मतदारसंघाकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. त्याचा आमदार असतो हे देखील कुणाला माहीत नसायचे. महादेवराव महाडिक यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकल्यापासून या लढतीला महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी १९९७ च्या लढतीत काँग्रेसचे मतदान जास्त असूनही आर्थिक ताकद, राजकीय वर्चस्वाचा वापर करून ही जागा जिंकली होती. हाच फाॅर्म्युला मागील दोन निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनीही वापरला व ही जागा आपल्याकडे खेचून घेतली.

शिंदे यांचे साधेपणा..

- या मतदारसंघाचे पहिले आमदार सदाशिवराव शिंदे यांनी विडी कामगारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यासाठी प्रयत्न केले.

- शेका पक्षाचे आमदार त्र्यं. सि. कारखानीस यांच्या साधेपणाचा किमान गवगवा तरी झाला, परंतु शिंदे हे देखील तितकेच साधे सरळ आयुष्य जगले. परंतु ते कोल्हापूरच्या विस्मृतीत गेले.

अशा झाल्या यापूर्वीच्या पाच लढती..

- वर्ष १९९७ (एकूण मते ३५१)

आमदार महादेवराव महाडिक अपक्ष- २२२

वडगांवचे तत्कालीन नगराध्यक्ष विजयसिंह यादव (काँग्रेस)-१२९

महाडिक हे ९३ मतांनी विजयी.

वर्ष २००३ : काँग्रेसचे उमेदवार म्हणून महादेवराव महाडिक बिनविरोध विजयी (तत्कालीन माजी महापौर बाबू हारूण फरास यांची अचानक माघार)

वर्ष २००९ : (एकूण मते ३८३)

काँग्रेसचे उमेदवार महादेवराव महाडिक-२९२

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा.जयंत पाटील-१७१

(महाडिक ४१ मतांनी विजयी, मताधिक्क्य निम्म्यावर)

वर्ष २०१५ (एकूण मते ३८२)

काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील २२०

महादेवराव महाडिक (भाजप पुरस्कृत) १५७

बाद - ०५

काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील ६३ मतांनी विजयी.

वर्ष २०२१ (एकूण मते ४१५)

काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध विजयी

भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी राज्यस्तरीय निर्णयानुसार घेतली माघार.

Web Title: Legislative Council Election Mahadevrao Mahadik was also unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.