कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा गुणवत्तेत आघाडीवर, ‘डाएट’कडून त्रयस्थ मूल्यांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 01:15 PM2022-05-12T13:15:22+5:302022-05-12T13:19:39+5:30

संतोष मिठारी कोल्हापूर : शालेय पातळीवरील शिक्षणाची मानके सुधारण्यासाठी शासनाने शाळासिद्धी बाह्यमूल्यांकनाचा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा ...

Leading 161 schools in the kolhapur district in quality | कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा गुणवत्तेत आघाडीवर, ‘डाएट’कडून त्रयस्थ मूल्यांकन

कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा गुणवत्तेत आघाडीवर, ‘डाएट’कडून त्रयस्थ मूल्यांकन

Next

संतोष मिठारी

कोल्हापूर : शालेय पातळीवरील शिक्षणाची मानके सुधारण्यासाठी शासनाने शाळासिद्धी बाह्यमूल्यांकनाचा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डाएट) ‘अ’ दर्जाच्या १९० शाळांचे बाह्यमूल्यांकन केले. त्यापैकी १६१ शाळांच्या गुणांमध्ये वाढ झाली तर २५ शाळांचे गुण घटले. चार शाळांचे गुण स्थिर राहिले. ‘डाएट’ने त्रयस्थ पद्धतीने या मूल्यांकनाची प्रक्रिया राबविली. शाळासिद्धी अंतर्गत मूल्यांकनावर जिल्हा, राज्य आणि देशाच्या शालेय शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून आहे.

त्यासाठी डाएटने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्यांकनाचा गेल्यावर्षी उपक्रम राबविला. शाळा मानके व शालेय मूल्यांकन प्रतिसाद, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन गाभा मानके, विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास, कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, शाळा विकास व्यवस्थापन समितीचे आयोजन व व्यवस्थापन, उत्पादक समाजाचा सहभाग या घटकांवर शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यातील निष्कर्षांच्या आधारे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर घालण्यासाठी काही उपक्रम जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून राबविले जाणार आहेत.

मूल्यांकनातून असे चित्र समोर आले

  • शाळांच्या स्वयंमूल्यांकनापेक्षा बाह्यमूल्यांकनाच्या प्राप्त गुणांमध्ये वाढ झालेल्या शाळा अधिक आहेत
  • स्थिर गुण असलेल्या शाळांचे प्रमाण अत्यल्प आहे
  • स्वयंमूल्यांकन ते बाह्यमूल्यांकन दरम्यान डाएटने राबविलेल्या कार्यक्रमांनी शाळासिद्धीच्या बाह्यमूल्यांकनात वाढ झाली
     

‘डाएट’ने राबविलेले उपक्रम

जिल्हा परिषदेच्या सहकार्याने डाएटने विविध कार्यक्रम राबविले. समावेशित शिक्षण, ९००३ शिक्षकांना प्रशिक्षण, गणित व विज्ञान ऑनलाईन प्रशिक्षण, मैत्री करूया विज्ञान-गणिताशी, स्वाध्याय, ऑनलाईन शिक्षण परिषद, नवोपक्रम स्पर्धा, गोष्टींचा शनिवार, शाळा भेटी, शिक्षक-यशोगाथा, आदी १८ कार्यक्रमांचा समावेश होता. त्याची शाळासिद्धीच्या मूल्यांकन वाढीसाठी मदत झाल्याचे ‘डाएट’चे प्राचार्य आय. सी. शेख यांनी मंगळवारी सांगितले.

कोरोनातही मानकाचा वाढता आलेख

शालेय शिक्षणाची गुणवत्ता, दर्जा यातील सुधारणा होण्याच्या दृष्टीने शाळासिद्धी हा सर्वंकष मूल्यांकनाचा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात राबविलेल्या पथदर्शी कार्यक्रमातून कोरोनाच्या कालावधीतदेखील शाळासिद्धी मानकाचा वाढता आलेख दिसून आला.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • मूल्यांकन केलेल्या एकूण शाळा : १९०
  • मानांकनात गुणवाढ झालेल्या शाळा : १६१
  • गुण घटलेल्या शाळा : २५
  • गुण स्थिर असलेल्या शाळा : ४

Web Title: Leading 161 schools in the kolhapur district in quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.