‘सखीं’च्या जल्लोषात ‘आनंदोत्सवा’ला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:11 PM2020-02-08T16:11:16+5:302020-02-08T16:13:40+5:30

महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हळदी-कुंकू, फिटनेसचा आधुनिक मंत्रा असलेला झुंबा डान्स, मेहंदी स्पर्धा, ज्वेलरीचे प्रशिक्षण, सायकल, मिनी ट्रेन, ई-बाईकची राईड आणि सायंकाळी रॉक बॅँडच्या तालावर धम्माल नृत्याचा आनंद अशा जल्लोषात शुक्रवारी ‘लोकमत सखी मंच’ आयोजित आनंदोत्सव व शॉपींग फेस्टिवलचा प्रारंभ झाला.

The launch of 'Anandotsava' in celebration of 'Sakhi' | ‘सखीं’च्या जल्लोषात ‘आनंदोत्सवा’ला प्रारंभ

 'लोकमत सखी मंच'च्या वतीने हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित 'सखी आनंदोत्सवा'चे उद्घाटन शुक्रवारी गौरी जोग यांच्या हस्ते झाले. यावेळी सुधर्म वाझे, वंदना मोहिते, सुशील अग्रवाल, अनिल कांबळे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे‘सखीं’च्या जल्लोषात ‘आनंदोत्सवा’ला प्रारंभधम्माल मनोरंजन, खरेदीची धूम

कोल्हापूर : महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हळदी-कुंकू, फिटनेसचा आधुनिक मंत्रा असलेला झुंबा डान्स, मेहंदी स्पर्धा, ज्वेलरीचे प्रशिक्षण, सायकल, मिनी ट्रेन, ई-बाईकची राईड आणि सायंकाळी रॉक बॅँडच्या तालावर धम्माल नृत्याचा आनंद अशा जल्लोषात शुक्रवारी ‘लोकमत सखी मंच’ आयोजित आनंदोत्सव व शॉपींग फेस्टिवलचा प्रारंभ झाला.

हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते या आनंदोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अग्रवाल गोल्ड अ‍ॅँड सिल्व्हरचे सुशील अग्रवाल, गोविंद नारायण जोग ज्वेलर्सच्या गौरी जोग, साई सर्व्हिसचे सुधर्म वाझे व वंदना मोहिते, माय टीव्हीएसचे अनिल कांबळे उपस्थित होते.

नवीन वर्षात सखी सदस्यता नोंदणीसोबतच ‘आनंदोत्सवा’च्या माध्यातून धम्माल मनोरंजन आणि आपल्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देत वर्षाच्या सुरुवातीलाच जल्लोषाचे रंग भरले. विविधरंगी आणि विविधढंगी कार्यक्रमांची मेजवानी देत सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत सखींच्या अपूर्व उत्साहाने पहिल्याच दिवशी रंगत आणली.

आनंदोत्सवाची सुरुवात आरोग्यदायी आणि भल्या सकाळी सखींमध्ये चैतन्य आणणाऱ्या झुंबा डान्सने झाली. १० वाजल्यानंतर हळदी-कुंकू हा पारंपरिक सोहळा सुरू झाला. त्यानंतर स्त्रीसौंदर्य खुलविणारी मेहंदी स्पर्धा आणि ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा झाली.

सायंकाळी ‘कोल्हापुरी’ या संकल्पनेवर आधारित फॅशन शो झाला. यात सखींनी कोल्हापूरची संस्कृती दाखविणारी पारंपरिक मराठमोळी वेशभूषा केली होती. सुरेख सजलेल्या सखी एक-एक करून रॅम्प वॉक करीत होत्या. त्यानंतर अभंग आणि श्लोक स्पर्धा झाली.

महेश हिरेमठ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याचदरम्यान रॉक बॅँडच्या तालावर ‘सखी’ आपले वय विसरून थिरकल्या. या कार्यक्रमास ‘विक्रम टी’चे तानाजी देशमुख, ‘माधवबाग’चे डॉ. विजय बांगर, ‘रोहिता बुटिक’च्या सविता पालकर, ‘नाईन टू नाईन’च्या माधवी सुतार यांचे सहकार्य लाभले.

सेल्फी पॉइंट... राईडची धूम

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांना स्वत:च्या जगण्याचा आनंदही अनुभवता यावा, यासाठी मनोरंजनाच्या विविध साधनांनी सखींना अधिक खुलविले. मिनी ट्रेन, सायकल, एटीव्ही, ई बाईक, सॅगवे अशा नव्या-जुन्या वाहनांच्या राईडची मजा घेतली. हॉलच्या बाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटला सेल्फी घेण्यात सगळ्या गुंतल्या होत्या.

मनोरंजन आणि खरेदीही...

स्त्रिया आणि शॉपिंग यांचे घट्ट नाते आहे. एकीकडे रंगमंचावर विविध कार्यक्रमांचे सादरीकरण, स्पर्धा, नृत्याची धूम; दर दुसरीकडे एकाच छताखाली सगळ्या वस्तू उपलब्ध करून देणारे वेगवेगळे स्टॉल्स असा दुहेरी आनंद महिलांनी लुटला. गृहोपयोगी वस्तू, सजावट, शिक्षण, मिठाई, कपडे, ज्वेलरी, खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारच्या स्टॉल्सवर महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

स्पर्धेचे निकाल असे (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय)

  • मेहंदी स्पर्धा : निपा मकाटी, सारा मुल्ला, इकरा मणेर
  • फॅशन शो : रेणुका केकटपूरे, सीमा रेवणकर, श्रीदेवी पाटील
  • श्लोक स्पर्धा : विद्या उंडाळे, शीतल जाधव, साधिका कालेकर
  • अभंग स्पर्धा : सुखदा बिदनूर, वनिता बक्षी, पूजा तेंडुलकर.

 

 

Web Title: The launch of 'Anandotsava' in celebration of 'Sakhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.