Kolhapur News: टेबलच्या ड्रॉव्हरमधील वही काढली; देवाण-घेवाणीची आकडेवारी उघड झाली
By समीर देशपांडे | Updated: December 9, 2025 15:37 IST2025-12-09T15:36:43+5:302025-12-09T15:37:07+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील प्रकार : बिलांनुसार टक्केवारी घेतली जात असल्याचा संशय

Kolhapur News: टेबलच्या ड्रॉव्हरमधील वही काढली; देवाण-घेवाणीची आकडेवारी उघड झाली
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेली अनेक महिने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या फायली का थांबत होत्या, हे सोमवारी उघडकीस आले. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील ड्राॅव्हरमध्ये लाल नोंदवही सापडली आणि देवाणघेवाणीची आकडेवारीच समोर आली.
शासकीय कर्मचाऱ्यांना ठराविक आजार झाल्यानंतर उपचाराअंती वैद्यकीय बिले शासनाकडून अदा केली जातात. त्यासाठी संबंधित कार्यालयाकडून बिलाची फाईल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे येते. या ठिकाणी ही फाईल मंजूर करण्यासाठीचा विभाग आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे नेमके बिल किती आहे त्यानुसार अडीच ते तीन टक्के पैसे घेतले जात होते आणि मगच मंजुरीची सही केली जात होती हे या नोंदवहीवरून स्पष्ट होत आहे. त्यामध्ये नेत्यांकडून फोन आला तर ती फाईल मात्र वगळून थेट मंजूर केली जात होती.
एका दिवसात जितक्या फाईल तपासून होतील त्यासाठी एक नंबर दिला जात असे. समजा ७६ नंबर दिला असेल तर नोंदवहीच्या तीनही पानांना ७६ हा नंबर देण्यात आला आहे. या प्रत्येक पानावर कोणाची फाईल होती आणि त्याच्या वैद्यकीय बिलाची रक्कम किती हे लिहिलेले असून त्यापुढे किती पैसे त्याच्याकडून घेतले त्याचाही उल्लेख आहे. त्यानंतर तिसऱ्या पानाच्या शेवटी ७६ नंबरचे दीड लाख रूपये मॅडमना दिले, असा स्पष्ट उल्लेख करून त्याखाली २८ मार्च २०२५ अशी तारीखही लिहिली आहे. अशी ६२ पाने लिहिण्यात आली असून पानाच्या शेवटी काही ठिकाणी लाल शाईच्या पेनने किती पैसे दिले याचा उल्लेख आहे.
संजय पवार, विजय देवणे, संतोष रेडेकर, मंजित माने, अवधूत साळोखे, संजय जाधव, पप्पू कोंडेकर, राहुल माळी, अक्षय पाटील, अभिजित बुकशेट,युवराज जाधव, अनिकेत घोटणे, प्रवीण पालव, सुरेश पाटील आदी उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राजकीय कार्यकर्ते आणि इतरांचीही नावे
या वहीत काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांची नावे आहेत. हे दोन्ही नेते नेहमी सीपीआर, जिल्हा परिषदेत दिसत असतात. त्यांना किती तारखेला किती पैसे दिले याचाही उल्लेख वहीत आहे.
दुसऱ्या ड्राॅव्हरमधील वही काढा
ही सर्व नोंद असलेली वही नेमकी कुठे आहे याची माहिती उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांना एका खबऱ्याने दिली होती. त्यामुळे फायली तपासण्यासाठी म्हणून सर्वजण पहिल्या मजल्यावर गेले आणि पवार यांनी या टेबलच्या दोन नंबरच्या ड्रॉव्हरमधील वही बाहेर काढा, म्हणून सांगितले. ही वही बाहेर काढण्यात आली आणि आतापर्यंत सोबत असलेला शिपाई तेथून सटकला.
दोन वर्षांपासूनच्या फायली
या ठिकाणी दोन वर्षांपासूनच्या फायली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जोपर्यंत तुमच्याकडे कोणी मांडवली करायला येत नाही तोपर्यंत तुम्ही या फायली क्लिअर करणारच नाही, असा संतप्त सवाल यावेळी पवार यांनी उपस्थित केला.
अधिवेशनात विषय निघण्याची शक्यता
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले असून त्याच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे हे सर्व प्रकरण अधिवेशनामध्ये उपस्थित होण्याची शक्यता असून तशी यंत्रणाही कामाला लागली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला असताना वकिलांशी बोलून निर्णय घेतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक सांगत होते.