उदो उदो! श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहचली किरणे; ६.१२ मिनिटांनी केलं चरणस्पर्श

By संदीप आडनाईक | Published: January 28, 2023 08:20 PM2023-01-28T20:20:17+5:302023-01-28T20:20:50+5:30

सात दिवसांच्या सिध्दांताला बळ : पूर्ण क्षमतेने होणार किरणोत्सव

In Kolhapur, Seven days Kironotsava begins at Ambabai Temple | उदो उदो! श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहचली किरणे; ६.१२ मिनिटांनी केलं चरणस्पर्श

उदो उदो! श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहचली किरणे; ६.१२ मिनिटांनी केलं चरणस्पर्श

googlenewsNext

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सात दिवसांच्या किरणोत्सवाला प्रारंभ झाला. मावळतीच्या सूर्यकिरणे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली, यामुळे सात दिवस किरणोत्सव होण्याच्या सिध्दांताला बळ मिळाले आहे. सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुरु झालेला हा प्रवास ६ वाजून १६ मिनिटांनी पूर्ण झाला. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा शुक्रवारपासून सुरू झाला.

आज, शनिवारी दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली. या सोहळ्याचे हजारो भाविकांंसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक दिंडे, धर्मनिरिक्षक गणेश नेर्लीकर देसाई, किरणोत्सव अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर साक्षीदार होते.

किरणोत्सवाचा प्रवास
सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर ५ वाजून ३८ मिनिटांनी गरुड मंडपातील चौथरा, ५ वाजून ४८ मिनिटांनी गणपती मंदिरातील जीना, ६ वाजून ०१ मिनिटांनी कासव चौक, ६ वाजून ०४ मिनिटांनी पितळी उंबरठा, ६ वाजून ०५ मिनिटांनी खजिना चौक असे टप्पे पूर्ण करत ६ वाजून १२ मिनिटांनी किरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १५ ते १६ मिनिटांपर्यंत किरणे कमरेपर्यंत पोहोचून देवीच्या डाव्या बाजूला लुप्त झाली.

किरणोत्सव सात दिवसांचा होणार

पूर्वी वर्षातील दोन्ही किरणोत्सव सोहळे तीन दिवसांचे होते, नंतर पाच दिवसांचे झाले. आता सलग सात दिवस पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होउ शकतो या सिध्दांताला शनिवारच्या निरिक्षणामुळे बळ मिळाले. विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक कारंजकर यांनी सातही दिवस या किरणोत्सवाचा अभ्यास सुरु केला आहे. देवस्थान समितीच्या माध्यमातून या सोहळ्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

स्वच्छ वातावरणाची साथ
स्वच्छ वातावरण आणि निरभ्र आकाशामुळे शनिवारी किरणोत्सवाची तीव्रता चांगली होती. गाभाऱ्यातील आर्दता ३५ च्या आत होती. आता २९ रोजी देवीच्या खांद्यापर्यंत, ३० आणि ३१ रोजी चेहऱ्यावर, १ तारखेला खांद्यावर आणि २ तारखेला चरणस्पर्श होउन या सोहळ्याची सांगता होईल, असे प्रा. कारंजकर म्हणाले.

कोल्हापूरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सुरु झालेल्या किरणोत्सवात सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यत पोहोचली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: In Kolhapur, Seven days Kironotsava begins at Ambabai Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.