आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:08 AM2019-10-15T01:08:35+5:302019-10-15T01:11:18+5:30

महाराष्टवर अफझलखानाची फौज चालून येत असल्याची टीका करून त्याला मातीत गाडा, असे आवाहन गेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आले होते. पाच वर्षांपूर्वी अफजलखान वाटणाऱ्या अमित शहा यांच्या कोल्हापुरातील सभेत शिवसेनेचे आमदार मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचे खरे मुखवटे जनतेने आता ओळखले आहेत.

How do you sit next to Amit Shah? | आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल

आता अमित शहा यांच्याजवळ कसे बसता ? -: चंद्रकांत जाधव यांचा सवाल

Next
ठळक मुद्देचंद्रकांत जाधव रोखठोक- मी उपद्रवशून्य माणूस; जनतेने विरोधकांचे खरे मुखवटे ओळखले आहेत

भारत चव्हाण ।
कोल्हापूर : ‘पाच वर्षांपूर्वी ज्या अमित शहा यांची अवहेलना तुम्ही अफझलखान म्हणून केली. त्याच शहा यांच्याशेजारी आता कसे बसता,’ असा सवाल सोमवारी ‘कोल्हापूर उत्तर’मधील काँग्रेस आघाडीचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित केला. ‘मी उपद्रवशून्य माणूस आहे, माझा कोणाला त्रास होणार नाही, झालीच तर मदत होईल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

जाधव यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना शहरातील आमदारांवर प्रथमच टीकास्त्र सोडले. गेल्या पाच वर्षांत तुम्ही कुठे होता, असा सवाल विरोधक करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता जाधव म्हणाले की, ‘मी कुठे होतो हे विरोधकांना दिसत नसले तर त्यात माझा नाईलाज आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने मी जनतेबरोबर राहिलो आहे. महापुराच्या काळात पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याच्या प्रयत्नांत होतो. वैद्यकीय शिबिरे घेतली आहेत. खेळाच्या मैदानावर आहे. सामाजिक कार्यातसुद्धा आघाडीवर आहे आणि त्याची माहिती जनतेला आहे’.
‘आतापर्यंतच्या सामाजिक व राजकीय जीवनात माझा कोणाला त्रास झाला नाही. खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे या गोष्टी तर माझ्या रक्तातही आणि स्वभावातही नाही. जनतेला माझा उपद्रव होईल, असे कधीच वागलो नाही. झालीच तर मदत होईल. निवडणुकीत लोक नेहमी तुलना करत असतात म्हणूनच मला विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘कार टू कारपेट नेता’ अशी टीका तुमच्यावर केली जात असल्याबद्दल विचारता जाधव यांनी सांगितले की, ‘त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे. मी कारपेटवर चालतो, फ्लोअरवर चालतो की रस्त्यावर चालतो हे जनतेला ठाऊक आहे. झोपडपट्टीपासून ते महालापर्यंत माझी ऊठबस आहे. कुठेही जाऊ शकतो. कुठेही बसू शकतो. कारण मी एक स्वच्छ प्रतिमेचा सर्वांबद्दल प्रेम असणारा, आदर बाळगणारा माणूस आहे. त्यामुळे ‘कार टू कारपेट’ अशी होणारी टीका निरर्थक आहे. आज मला जो वाढता पाठिंबा मिळतो आहे तेच या टीकेला चोख उत्तर आहे’.
तुम्ही भाजपमधून एकदम काँग्रेसमध्ये गेला आणि उमेदवारी मिळविली, त्यामुळे मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुम्हाला स्वीकारले आहे का? अशी विचारणा केली असता जाधव यांनी सांगितले की, ‘प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार पाहिजे असतो.

कार्यकर्त्यांनाही त्याची जाणीव असते. त्या उमेदवाराची प्रतिमा, त्याचा चेहरा, वर्तणूक, उपयोगीता, कामाची तळमळ याचा परिणाम मतात रूपांतर करण्यासाठी होतो. मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्टÑवादीसह आघाडीतील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. कार्यकर्ते आणि जनताच मला विजयापर्यंत घेऊन जात आहे’.


दहा वर्षे शहर मागे पडले
शहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा होता तो झाल्याचे दिसत नाही. पर्यटन, उद्योग आणि आयटी क्षेत्रात काम करण्याची येथे संधी आहे. गेल्या दहा वर्षांत आपले शहर बरेच मागे पडले. या क्षेत्रात शहराला पुढे नेण्यात संधी असतानाही बरीच निष्क्रियता दिसून आली. येथे पायाभूत सुविधा देण्यापासून अनेक अडचणी आहेत. त्यामुळे जनतेने ही निष्क्रियता ओळखली आहे. लोक प्रतिनिधी हा ट्रस्टी असतो. त्याने शाश्वत विकासाच्या भूमिकेतून काम केले पाहिजे, ही माझी भूमिका आहे, असे जाधव म्हणाले.


शहरात झालेल्या टोल, एलबीटीविरोधी आंदोलनात मी सक्रिय होतो. जीएसटीसंदर्भातील आंदोलनात होतो. वीज दरवाढीविरोधातील आंदोलनात होतो आणि याची सर्वाना माहिती आहे.

 


 

 

Web Title: How do you sit next to Amit Shah?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.