गावाने वाळीत टाकल्याचे दुःख कोरोनापेक्षा भयानक, पन्हाळा तालुक्यातील तरुणाने मांडली वेदना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:24 AM2020-07-15T00:24:33+5:302020-07-15T00:25:13+5:30

कोरोना आज आहे उद्या जाईल.आज मला झालाय,उद्या कोणालाही होईलपण लोकांनी माणुसकी जपली पाहिजे असे आवाहन त्याने केले आहे.

The grief inflicted by the village is worse than the corona, the pain was expressed by a young man from Panhala taluka | गावाने वाळीत टाकल्याचे दुःख कोरोनापेक्षा भयानक, पन्हाळा तालुक्यातील तरुणाने मांडली वेदना

गावाने वाळीत टाकल्याचे दुःख कोरोनापेक्षा भयानक, पन्हाळा तालुक्यातील तरुणाने मांडली वेदना

Next

कोल्हापूर : आम्हाला कोरोनाची भीती वाटली नाही पण तो झाला आहे असे समजल्यावर गावाने वाळीत टाकले आणि जी आपली माणसे म्हणत होतो त्यांनीही साधा फोन करून आमची विचारपूस केली नाही याच्या मनाला खूप वेदना झाल्याची भावना पन्हाळा तालुक्यातील एका तरुणाने मंगळवारी व्यक्त केली आहे. कोरोना आज आहे उद्या जाईल.आज मला झालाय,उद्या कोणालाही होईलपण लोकांनी माणुसकी जपली पाहिजे असे आवाहन त्याने केले आहे. त्याच्यासह वडिलांनाही कोरोना झाला होता हे दोघेही त्यातून बरे होऊन घरी आल्यानंतर या तरुणाने या काळात आलेले अनुभव शेअर केले आहेत.

तो सांगतो, मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील.वडील मुंबईत  नोकरीला होते.  ३०एप्रिलला ते निवृत्त झाले. पण लॉकडाऊन मुळे ते मुंबईतच अडकून पडले. खाजगी गाडीने गावी घेऊन आलो. त्यांना गावाबाहेरील  लॉजमध्ये कॉरंटाईन केलं. मी किंवा माझा भाऊ रोज  जेवणाचा डबा घेऊन जायचो. वडिलांना कोणतंही लक्षण नव्हतं. आठव्या दिवशी माझ्या मामांना न्युमोनीया झाला अन त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आम्ही वडिलांचीही टेस्ट केल्यावर ते पॉझिटिव्ह आले. ते ऐकून आम्ही हादरून गेलो. सगळे ओक्साबोक्सी रडायला लागले. मी सुध्दा खूप घाबरलो.वडील मात्र सगळ्यांना धीर देत होते. ते खंबीर होते. रात्री अकरा वाजता रुग्णवाहिका आली अन ते वडिलांना घेऊन गेली.

कोल्हापूरातील  नामांकीत हॉस्पिटलमधे उपचारांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी यासाठी ३ लाखांचे पॅकेज असल्याचं सांगितले. डॉक्टर असलेल्या चुलत भावाने सीपीआरमध्येच दाखल व्हायला सांगितले. वडील  तिथे दाखल झाले.  दुसऱ्या दिवशी आम्हा दोघां भावाचीही कोरोना टेस्ट झाली. त्यात भाऊ निगेटीव्ह आला अन माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. पुन्हा पायाखालची जमीन सरकली. आता हे घरी सांगायचं कसं या काळजीने मला घेरलं. शेवटी हिम्मत करुन पत्नीला फोन केला. तिला शपथ घातली अन अजिबात काळजी करु नको,  सगळं ठिक होईल, फक्त आईला व पोरीला जप असं सांगितले. मी आणि वडील दोघांमधेही लक्षने काहीच दिसत नव्हती. दोघंही एकाच वेळी  सीपी आरच्या दोन वेगवेगळ्या वॉर्डमधे दाखल होतो. 

माझी परत नवव्या दिवशी टेस्ट केल्यावर मी निगेटीव्ह आलो. वडीलही बरे होऊन बाहेर आले. माझ्यासोबत ६५ ते ७० वयाच्या ३ महिला बऱ्या होऊन बाहेर पडल्या.  ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे तो पाचव्या दिवशीच ठणठणीत होतो. न्यूज चॅनल अन् सोशल मिडियाने कोरोनाचा खूप बाऊ केला आहे.
 
आपलं सीपीआर लईभारी...!!
आम्हाला सांगायला आनंद होतो की कोल्हापुरातील सीपीआरमध्ये खरेच कोरोनाबाधित रुग्णांची इतकी चांगली व्यवस्था आहे ,की खाजगी दवाखानेही याच्यासमोर फिके पडतील. दाखल केल्यानंतर माझी ईसीजी केली. रक्त तपासणी आणि सिटी स्कँनही केलं.   दिवसातून तीन वेळा तिथला हाऊस किपिंग स्टाफ वॉर्ड सॅनिटाइज करायचा. वेळेवर नाश्ता, चहा अन रुचकर जेवण मिळायचं. तिथला नर्सिंग स्टाफ ही सगळ्यांशी आपुलकीनं वागतो. आम्हा सगळ्यांना वेळेत औषधे दिली जात होती. ज्यांना खोकला आहे त्यांना कफ सिरप द्यायचे. एकालाही इंजेक्शन किंवा सलाईन लावलेलं नव्हतं. वय जास्त किंवा खूप त्रास असेल तरच पुढची ट्रीटमेंट केली. दवाखान्यातील वातावरण पण खूपच चांगले होते. सगळे रुग्ण आनंदी आणि मनाने खंबीर होते. 

मित्रानो हा खरा आजार..
जेव्हा माझ्या वडिलांना अन मला कोरोना झालाय हे गावात समजलं, तेव्हा आम्ही रुग्णालयात असताना गावाने माझ्या कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकलं. आम्हाला कोणाच्या आर्थिक मदतीची गरज नव्हती पण अशा वेळी कुटुंबाला मानसिक आधार द्यायला हवा होता तो कोणाकडूनही मिळाला नाही. साधा फोन करुन तब्बेत कशी आहे हे कुणी विचारलं नाही. मित्राच्या वडिलांना  अर्धान्ग्वायूचा झटका आला तेव्हा खिशातले पैसे घालून त्यांच्यावर उपचार केले, पण या मित्राने साधी फोनवर चौकशीही  केली नाही.
सरकारी अधिकाऱ्यांचे बरेच फोन आले त्यांनी धीर देण्यापेक्षा निष्काळजीपणा कसा केलात असेच ऐकवायचे.प्रत्यक्षात आम्ही पुरेशी दक्षता घेतली होती..

गावकऱ्यांचे फोन पण यासाठी...

गावातील काही लोकांचे फोन यायचे ते हे विचारण्यासाठी की आपण कुठे या आठ दिवसात भेटलोत का..?  आपण हस्तांदोलन केलं का..? पण आमच्या तब्बेतीबद्दल कुणीही साधी विचारपूस केली नाही. 

जीवघेणी अफवा..
मला ५ वर्षांची मुलगी आहे. तिचीही तब्बेत बिघडलीय अशी अफवा गावात उठवली गेली. मला कोरोनापेक्षा या गोष्टींचा खूप त्रास झाला. खरोखर मी या काळात लोकांतील माणुसकीचा अंत पाहिला. वेळ सर्वांवर येते. अशा प्रसंगी लोकांनी धीर देणं गरजेचं असतं. 

गरज फक्त मानसिक आधाराची..
हे आजारपण कुणी स्वत:हून मागून घेत नसतो. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेतली असतानाही हा आजार झाला. अशा प्रसंगी सर्वांनी त्या पेशंटला त्याच्या कुटुंबियांना मानसिक आधार द्यायची गरज असते. पेशंट मनाने खंबीर असेल तर ठिक नाहीतर लोकांच्या अशा तुसड्या वागणुकीने एखादा पेशंट वैफल्यग्रस्त होऊन टोकाचं पाऊल उचलायलाही मागे पुढे पाहणार नाही

यांचा आधार मोलाचा..!!
माझ्या  कुटुंबावर  आभाळ कोसळलेलं असताना काही चांगले लोकही भेटले. मी जिथे काम करतो, त्या आदित्य बिर्ला ग्रुप मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सीपीआरमधील मानसोपचार तज्ञानी खूप आधार दिला.

Web Title: The grief inflicted by the village is worse than the corona, the pain was expressed by a young man from Panhala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.