गणेशाचे दर्शन तेही लांबूनच; रात्रीची शहरात वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:28+5:302021-09-18T04:27:28+5:30

कोल्हापूर : या वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट असल्याने, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात असला, ...

Ganesha's darshan is far away; The hustle and bustle of the city at night | गणेशाचे दर्शन तेही लांबूनच; रात्रीची शहरात वर्दळ

गणेशाचे दर्शन तेही लांबूनच; रात्रीची शहरात वर्दळ

Next

कोल्हापूर : या वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट असल्याने, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात असला, तरी शुक्रवारी रात्री मात्र शहरात बऱ्यापैकी वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळाले. श्रीगणेशाचे दर्शन तेही लांबूनच घेण्यासाठी नागरिक रात्री घराबाहेर पडले होते, विशेषत: राजारामपुरी, शिवाजी चौक येथे तुलनेने गर्दी जास्तच होती.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार या वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सजीव व तांत्रिक देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती, विद्युत रोषणाई करण्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळले आहे, तरीही शुक्रवारी राजारामपुरी व शिवाजी चौक परिसरात गणेशाचे दर्शन घेण्यास नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केली होती.

श्रीगणेशाचे लांबूनच दर्शन घेऊन नागरिक पुढे जात होते. दुचाकी, तसेच चारचाकीतूनही काही नागरिक सहकुटुंब घराबाहेर पडले होते. शाहूमिल, राजारामपुरी व भेंडेगल्ली येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप झाला.

राजारामपुरी जनता बझार समोरील खाऊगल्लीत, तसेच खासबाग मैदानाजवळील खाऊगल्लीत मात्र नागरिकांची गर्दी झाली होती. खवय्यांनी गरमागरम, रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. या ठिकाणी सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे जाणवले.

कोरोनाच्या संकटामुळे मंडळाचे कार्यकर्ते शासनाच्या नियमांचे पालन करत असल्याचे दिसून आले. या वर्षीच्या गणेशोत्सवात नेहमीचा उत्साह दिसत नसला, तरी गेल्या काही दिवसांपासून केवळ आरती, पूजा, महापूजा असे धार्मिक कार्यक्रम मात्र होत आहेत. त्यालाही मोजकेच लोक उपस्थित असतात. मर्यादित आवाजात भक्तिगीते ऐकविली जात आहेत.

Web Title: Ganesha's darshan is far away; The hustle and bustle of the city at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.