कोल्हापूर : केवळ मोठ्या व्यक्तींना, उद्योगांना, व्यवसायांना कर्जे न देता महिला बचतगटांना जाणीवपूर्वक अर्थसहाय्य करण्याची स्वामी विवेकानंद पतसंस्थेची योजना अनुकरणीय असल्याचे प्रशंसाेद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेच्या येथील आझाद चौक शाखेत मंगळवारी स्वामी विवेकानंद जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव टोपले होते.
काकडे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगले कर्जदार शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद पतसंस्थेने ठेवी आणि कर्जावरील व्याजदर कमी करून सभासदांना आणखी सुलभ सेवा द्यावी.
संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले म्हणाले, सव्वाशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा संस्था लवकरच ओलांडणार आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी शाखा उघडण्याचाही प्रस्ताव आहे. या स्पर्धेच्या काळातही जिल्ह्यातील एक अग्रग्ण्य पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकिक मिळविला आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला बचतगटांना अर्थसहाय्याचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक मलिककुमार बुरूड यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक सुरेश कुंभार, कोल्हापूर शाखा अध्यक्ष सुनील निकम, शशिकांत म्हस्कर, निवास भोसले, संभाजी परळकर, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार, शाखाधिकारी नारायण बेहेरे, ॲड. किरण मुंगळे, ॲड. शंकरराव सोलापूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
१२०१२०२१ कोल स्वामी विवेकानंद पतसंस्था
आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या कोल्हापुरातील आझाद चौक शाखेत विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महादेव टोपले, अध्यक्ष जनार्दन टोपले, मलिककुमार बुरूड, सुरेश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.