‘मुऱ्हा’, ‘म्हैसाणा’ची भुरळ; दूध वाढीला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 11:52 AM2021-12-08T11:52:00+5:302021-12-08T11:57:32+5:30

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा म्हैस खरेदीचा ओढा वाढला आहे. यामुळे संघाला दूध वाढीला हातभार लागला असून गेल्या सात महिन्यात ३ लाख ५८ हजार लिटरने संकलनात वाढ झाली आहे.

Farmers get interest free purchase of buffaloes through Annasaheb Patil Financial Backwardness Corporation | ‘मुऱ्हा’, ‘म्हैसाणा’ची भुरळ; दूध वाढीला बळ

‘मुऱ्हा’, ‘म्हैसाणा’ची भुरळ; दूध वाढीला बळ

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात ‘हरियाणा’ व ‘गुजरात’ येथून शेतकऱ्यांनी तब्बल ८०२ ‘मुरा’ आणि ‘म्हैसाणा’ म्हशी आणल्या आहेत. त्यातून संघाला दूध वाढीला हातभार लागला असून गेल्या सात महिन्यात ३ लाख ५८ हजार लिटरने संकलनात वाढ झाली आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा म्हैस खरेदीचा ओढा वाढला असून येत्या दोन-तीन महिन्यात आणखी १४०० म्हशी येणार आहेत.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर दूध वाढकृती कार्यक्रम हाती घेतला आहे. आगामी तीन वर्षात कोणत्याही परिस्थितीत २० लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवून अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक मंडळाने पावले उचलली आहेत. कोल्हापूरच्या माती व पाण्याच्या गुणधर्मामुळे येथील दूधाला वेगळीच चव आहे. त्याची भुरळ मुंबईसह इतर मोठमोठ्या शहरात पडली आहे. विशेष म्हणजे ‘गोकुळ’च्या म्हैस दूधाला बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने दूधाचा तुटवडा भासत आहे. यासाठी संघाने दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत गुजरात व हरियाणा येथून म्हैस खरेदीवर भर दिला आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संघ २५ हजार अनुदान देतेच, त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या माध्यमातून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्यावतीने बिनव्याज कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढला असून एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत ‘गोकुळ’मध्ये ८०२ म्हशी आल्या आहेत. त्याशिवाय १४०० प्रस्ताव बँकेच्या पातळीवर प्रलंबित असून त्याही म्हशी लवकरच येणार आहेत. ८०२ म्हशीच्या माध्यमातून १३ हजार लिटर दूध संकलनात भर पडली असून गेल्या सात महिन्यात ३ लाख ५८ हजार लिटरने दूध संकलन वाढले आहे.

जूनपर्यंत १७ लाख लिटरचा टप्पा पार होणार

सध्या ‘गोकुळ’चे दूध संकलन रोज १६ लाख ७० हजार लिटर आहे. येत्या सहा महिन्यात त्यात वाढ करून जूनपर्यंत १७ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

वासरु संगोपनातून ५९ हजार जनावरे दूधाखाली

‘गोकुळ’ने २००४-०५ पासून जातिवंत वासरु संगोपन योजना सुरू केली. त्याचे फलित आता दिसू लागले असून आतापर्यंत ५९ हजार ४५३ जनावरे दूधाखाली आली आहेत.

तुलनात्मक दूध संकलन लिटरमध्ये -

म्हैस/गाय मे २०२१ डिसेंबर २०२१

म्हैस ६ लाख ८२ हजार ९ लाख ८९ हजार

गाय ६ लाख २८ हजार ६ लाख ८० हजार

दूध वाढ कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच २० लाख लिटरचा टप्पा यशवीपणे पार करू. - विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)

हरियाणावरून आणलेल्य म्हशींचे संगोपन व्यवस्थित केले तर भरपूर दूध देतात. दूध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने या व्यवसायाकडे तरुण वळू लागला आहे. - शिवाजी देसाई (दूध उत्पादक, भामटे)

तालुकानिहाय म्हशी खरेदी- तालुका    हरियाणा        गुजरात
करवीर  १४२ 
गडहिंग्लज १० ६७
कागल ४११०
भुदरगड ३७१२
 पन्हाळा/गगनबावडा७२ 
हातकणंगले ७५ 
शिरोळ ५८ १५
राधानगरी ३१ १९
शाहूवाडी १४ 
आजरा १ 
चंदगड ४० ६५
कर्नाटक ८६ 
एकूण ६०७ १९५

Web Title: Farmers get interest free purchase of buffaloes through Annasaheb Patil Financial Backwardness Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.