कोल्हापुरातील पुरोगामी चळवळींना डॉ. बाबा आढाव यांचे कायमच होते बळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:41 IST2025-12-09T17:41:08+5:302025-12-09T17:41:35+5:30
कार्याचे मोठेपण : राजर्षी शाहू पुरस्काराने १९८९ ला सन्मानित

कोल्हापुरातील पुरोगामी चळवळींना डॉ. बाबा आढाव यांचे कायमच होते बळ
कोल्हापूर : विविध सामाजिक चळवळींचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांचे वेळोवेळी कोल्हापुरातील पुरोगामी चळवळींना बळ मिळाले. विशेषत: देवदासी, धरणग्रस्त आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा कोल्हापुरातील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. मानाच्या राजर्षी शाहू पुरस्कारानेही त्यांना १९८९ ला कोल्हापूरकरांनी सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील जुन्या सहका-यांनी आठवणींना उजाळा दिला.
हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, बांधकाम मजूर अशा कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी काम करण्यासह एक गाव एक पाणवठा मोहीम राबविणारे डॉ. आढाव कोल्हापुरातील सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय होते. तत्कालीन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, श्रीपतराव शिंदे, गोविंद पानसरे यांच्यासोबत त्यांनी पुरोगामी चळवळींमध्ये काम केले. गडहिंग्लज येथील देवदासी निर्मूलन चळवळीत त्यांचे विशेष योगदान होते.
अंधश्रद्धा निर्मूलन, जटा निर्मूलन उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. याशिवाय धरणग्रस्त, जंगलग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार होता. सामाजिक संस्था आणि पुरोगामी चळवळींच्या निमित्ताने त्यांची अनेक व्याख्याने कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज परिसरात झाली.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने त्यांना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित केले होते. कोल्हापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, व्यंकाप्पा भोसले, अरुण सोनाळकर, अनंत आजगावकर, शिवाजीराव परुळेकर, टी. एस. पाटील, दलितमित्र बापूसाहेब कांबळे, प्रा. विठ्ठल बन्ने अशा अनेकांनी त्यांच्यासोबत काम केले.
वर्षभरापूर्वीच कोल्हापूरला फेरी
अलीकडे वाढत्या वयामुळे त्याचे कोल्हापूरला येणे कमी झाले होते. गेल्या वर्षीच ते जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याच्या निमित्ताने कोल्हापूरला येऊन गेले. त्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर यांच्यासह इतरांना भेटून ते गेले होते. शिप्पूरकर यांनी त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. बाबांसारख्या लढाऊ माणसांची समाजाला आज जास्त गरज असताना त्यांनी निघून जाणे हे समाजाचे नुकसान करणारे आहे अशा भावना शिपूरकर यांनी व्यक्त केल्या.