घटस्थापनेला ‘अंबाबाई’चे द्वार खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:13+5:302021-09-25T04:26:13+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली राज्यातील सर्व मंदिरे दि. ७ ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने ...

The door of 'Ambabai' will open for marriage | घटस्थापनेला ‘अंबाबाई’चे द्वार खुले होणार

घटस्थापनेला ‘अंबाबाई’चे द्वार खुले होणार

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली राज्यातील सर्व मंदिरे दि. ७ ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने अंबाबाई मंदिराचे द्वार सुध्दा घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून भाविकांसाठी खुले होणार आहे. अंबाबाई मंदिरासह वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात जाऊन आपल्या दैवताचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

राज्यात कोरोनाची साथ पसरल्यानंतर पहिल्या लाटेवेळी अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर आठ महिने, तर दुसऱ्या लाटेवेळी सहा महिने बंद ठेवण्यात आले. मागच्यावेळी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही मंदिरे उघडली गेली. एप्रिलमध्ये पुन्हा ती बंद ठेवावी लागली. मंदिरे उघडण्याची मागणी भाविकांतून होत होती. अखेरीस शुक्रवारी राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत अद्याप येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. सरकारच्या निर्णयाची सविस्तर माहिती प्राप्त होताच त्याची कार्यवाही केली जाईल, असे सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले.

नवरात्रीत अंबाबाई मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे तासाला किती भाविकांना सोडायचे, मंदिर किती वेळ सुरू ठेवायचे याचे नियोजन करण्यात येईल. याशिवाय भाविकांना घरबसल्या देवीचे दर्शन तसेच दैनंदिन धार्मिक विधी पाहता यावेत याकरिता चॅनेलवरून लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात येईल, असेही नाईकवडे यांनी सांगितले.

कासव चौकातून होणार दर्शन...

मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता, भाविकांना कासव चौकातून दर्शन घेण्याची मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. गाभाऱ्याच्या उंबऱ्यापर्यंत भाविकांना जाऊ दिले तर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे पितळी उंबरा तसेच कासव चौक येथून जर भाविकांना दर्शन घेऊ दिले, तर गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. परंतु सरकारचे काय नियम आहेत हे पाहूनच स्थानिक पातळीवर नियोजन केले जाईल, असे सांगण्यात आले.

निर्णय दिलासादायक...

मंदिर काही महिने बंद असल्यामुळे मंदिराच्या परिसरातील शेकडो छोटे-मोठे व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद झाला होता. परंतु आता मंदिर उघडणार असल्याने त्यांच्यादृष्टीने हा निर्णय दिलासादायक आहे.

Web Title: The door of 'Ambabai' will open for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.