जिल्हा बॅँक नवीन ५० शाखा सुरू करणार, सर्वसाधारण सभेत हसन मुश्रीफ यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:10 AM2019-08-29T11:10:30+5:302019-08-29T11:14:53+5:30

वाढती बॅँकिंग व्यवस्था व सामान्य माणसाची गरज पाहून आगामी काळात ५० नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रिझर्व्ह बॅँकेची परवानगी मिळताच त्याची कार्यवाही होईल, अशी घोषणा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

 District Bank to open 3 new branches, Hasan Mushrif announced at General Assembly | जिल्हा बॅँक नवीन ५० शाखा सुरू करणार, सर्वसाधारण सभेत हसन मुश्रीफ यांची घोषणा

जिल्हा बॅँक नवीन ५० शाखा सुरू करणार, सर्वसाधारण सभेत हसन मुश्रीफ यांची घोषणा

Next
ठळक मुद्दे जिल्हा बॅँक नवीन ५० शाखा सुरू करणार, सर्वसाधारण सभेत हसन मुश्रीफ यांची घोषणा सभासदांना १० टक्के लाभांश : एकरी कर्जमर्यादा वाढविण्याची मागणी

कोल्हापूर : वाढती बॅँकिंग व्यवस्था व सामान्य माणसाची गरज पाहून आगामी काळात ५० नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रिझर्व्ह बॅँकेची परवानगी मिळताच त्याची कार्यवाही होईल, अशी घोषणा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची ८१वी सर्वसाधारण सभा शाहू सांस्कृतिक मंदिरात झाली. बॅँकेने नव्याने घेतलेल्या कोअर बॅँकिंग प्रणालीमध्ये पुराच्या काळात कनेक्टिव्हिटीची अडचणी आल्याने ग्राहकांची हेळसांड झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले, साडेचार वर्षे सभासदांनी सेवा करण्याची संधी दिली, तिचे सोने करीत बॅँक नंबर वन बनविली.

केंद्र सरकारच्या अपात्र ११२ कोटी कर्जमाफीचा लढा न्यायालयात आहे. व्याजासह पैशांची मागणी केली असून, या प्रकरणाचा महिन्याभरात निकाल लागेल. कर्मचाऱ्यांना नऊ टक्के बोनस, तर सभासदांना १० टक्के लाभांश देणार आहे.

मार्च २०२० अखेर कोणत्याही परिस्थितीत सहा हजार कोटींच्या ठेवी, १०० कोटींचा नफा, सर्व शाखा नफ्यात आणि तीन टक्क्यापर्यंत एनपीए आणू, त्यासाठी संचालक प्रयत्नशील असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

किसन कुराडे म्हणाले, सूतगिरण्यांसाठी एक रुपयाही दिला नाही. सूतगिरण्या उगीचच काढल्या अशी अवस्था तुमच्यातील अनेक संचालकांची झाली आहे. यावर ‘हे मागील जन्माचे पाप असल्या’ची टिप्पणी मुश्रीफ यांनी केली. विकास संस्थांप्रमाणे दूध व पतसंस्थांच्या थकबाकीच्या वसुलीत बॅँकेने सहकार्य करावे, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली.

खतांसह सर्वच शेती आनुषंगिक वस्तूंच्या किमती वाढल्या असून गेल्या २० वर्षांपासून पीककर्जाची मर्यादा तीच असून, त्यामध्ये वाढ करण्याची मागणी सभासदांनी केली. यावर शाखांत कर्मचाऱ्यांची कमतरता असून समतोल राखण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

यावर वस्तुस्थिती असून मुख्य कार्यालयासह शेजारील तालुक्यात संख्या जास्त आहे. त्यामध्ये दुरुस्ती करून दुर्गम भागात कर्मचारी दिले जातील. त्याचबरोबर नवीन ५० शाखांचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी अहवाल वाचन केले. संचालक भैया माने यांनी आभार मानले.

किसन कुराडेंना रोखले!

हसन मुश्रीफ यांनी प्रास्ताविक संपविल्यानंतर पहिल्यांदाच प्रा. किसन कुराडे बोलण्यास उठले. त्यांना रोखत ‘प्रत्येक वेळी तुमचेच गाऱ्हाणे ऐकायचे का?’ असा सवाल रमेश शिंदे (कवठेगुलंद) यांनी केला. त्यानंतर काहीसा गोंधळ उडाला.

संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव

प्रशासकीय कारकिर्द संपुष्टात आणत साडेचार वर्षांत बॅँकेला प्रगतिपथावर नेण्याचे काम अध्यक्ष हसन मुश्रीफ व संचालकांनी केले. त्याबद्दल संस्थाचालकांनी त्यांच्यावर अभिनंदनाच्या ठरावांचा वर्षाव केला.

मुश्रीफसाहेब माना हलेपर्यंत तुम्हीच राहावा

संचित तोटा कमी करून राज्यातील नंबर वन नफ्यात बॅँक आणली. संस्थांना १० टक्के लाभांश दिला. तुमच्याकडे जादूची कांडी आहे. मुश्रीफसाहेब, माना हलेपर्यंत तुम्हीच सर्वजण बॅँकेचे संचालक राहा आणि आम्हाला २० टक्के लाभांश द्या, अशी मागणी तानाजी खोत (चांदेकरवाडी) यांनी केली.

मुश्रीफ यांचा ‘गोकुळ’च्या नेत्यांचा चिमटा

मागील प्रोसीडिंग अहवालात का छापले नाही, याबद्दल किसन कुराडे जाब विचारत असताना काही सभासदांनी त्यांना रोखल्याने गोंधळ उडाला. त्यावर ‘आपणाला सभा चालवायची आहे. एका मिनिटातही सभा संपविता आली असती,’ असा चिमटा हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या नेत्यांना काढला.

स्वागत स्वीकारूनच महाडिक परतले

महादेवराव महाडिक हे पाऊण वाजता सभास्थळी आले. उपस्थित संचालकांनी त्यांचे स्वागत केले. सभेला उपस्थित असल्याबद्दलची स्वाक्षरी केली आणि ते पाच मिनिटांत निघून गेले. यावेळी स्वागतासाठी उभे असलेले बाबासाहेब पाटील-आसुर्र्लेकर यांच्याकडे पाहत, ‘काय बाबासाहेब, मुश्रीफ यांनी शिकारीसाठी तुम्हाला पुढे पाठविले का? ते कोठे आहेत, बोर्ड मीटिंग घेतात का?’ अशी विचारणा केल्याने उपस्थितीत संचालकही गोंधळून गेले.

उपाध्यक्ष कोठे आहेत?

सभेला उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक विनय कोरे, खासदार संजय मंडलिक यांनी पाठ फिरविली. अप्पी यांच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत, ‘बॅँकेचे उपाध्यक्ष कोठे आहेत?’ असा सवाल सभासदांनी केला. यावर ‘अहवालात फोटो आहे ना?’ असे मिश्किल उत्तर मुश्रीफ यांनी दिल्याने एकच हशा पिकला.

या झाल्या मागण्या

  1. गटसचिवांना संगणक प्रशिक्षक द्या
  2. मागील प्रोसीडिंगचे पान अहवालासोबत द्या.
  3. ११२ कोटी अपात्र कर्जमाफीचा या कर्जमाफीत समावेश करावा.
  4. पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्जात व्याजसवलत व हप्ते पाडून द्या.

 

 

Web Title:  District Bank to open 3 new branches, Hasan Mushrif announced at General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.