Dhangar Leaders met with Chhatrapati Sambhaji Raje will take the initiative for reservation | “छत्रपतींचं आणि धनगर समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध”; आरक्षणासाठी संभाजीराजे पुढाकार घेणार

“छत्रपतींचं आणि धनगर समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध”; आरक्षणासाठी संभाजीराजे पुढाकार घेणार

ठळक मुद्देमराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू धनगर समाजाच्या नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजेंची कोल्हापूरात भेट घेतली बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाची व्याख्या करतानाच धनगर बांधवांचाही त्यात समावेश करून त्यांना त्यावेळी आरक्षण दिलेले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जसा माझा लढा आहे, तसाच तो धनगर समाजासाठीही असणार आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी संभाजीराजे यांची न्यू पॅलेसवर भेट घेतली. ‘आपण मराठा आरक्षणाच्या चळवळीचे नेते आहात; परंतु आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका तुम्ही जाहीर करावी,’ अशी विनंती शिंदे यांनी त्यांना यावेळी चर्चेत केली.

या बैठकीनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद घेण्यात आली. मला आनंद आहे की, संयोजकांनी यासाठी कोल्हापूरची निवड केली. कारण ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, वारसा आहे. शाहू महाराजांनी जे बहुजन समाजाला आरक्षण दिले त्यात एस.टी., एन. टी., ओबीसी, मराठा समाजाचा समावेश होता.

आज राम शिंदे माझ्याकडे एवढ्यासाठीच भेटायला आले की, तुमचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा हवा. मी त्यांना सांगितले की, पाठिंबा मागण्याची गरजच नाही. राजर्षी शाहू महाराजांनी जनकबहीण चंद्रप्रभा घाटगे यांचा विवाह यशवंतराव होळकर यांच्याशी केला. ती नाळ त्या वेळेपासून जुळलेली आहे. धनगर समाज हा प्रामाणिक आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी जशी त्यावेळी या समाजाविषयी जबाबदारी पार पाडली, तशीच ती आमचीही जबाबदारी आहे.

तर कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद झाली, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवतायेत, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणावरही संभाजीराजेंनी लक्ष घालावं, मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन संभाजीराजेंनी धनगर समाजाला दिल्याचं राम शिंदे यांनी सांगितले.

गोलमेज परिषदेत मांडलेले ठराव

महाराष्ट्रात धनगर समाज १२ पोटशाखेंमध्ये विखुरला आहे. प्रत्येक पोटशाखेत कोणी ना कोणी नेता आहे, राजकीय पक्षाचा नेता, आजीमाजी आमदार, खासदार आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आहे, अशा सर्व लोकांनी घटनेमध्ये दिलेले आरक्षण या थेट आणि तात्काळ लाभ मिळेपर्यंत ‘धनगर सारा एक’ या भावनेतून आंदोलन करायचं, सर्वानुमते हा ठराव समंत केला.

गोलमेज परिषद तातडीने भरवली, अनेक पक्षाचे पदाधिकारी सहभागी होऊ शकले नाहीत, परंतु फोनवरुन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे, गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवून पुन्हा बैठक घ्यावी

धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय मेंढपाळ आणि भटकंती आहे, प्रत्येक जिल्ह्यातून तो प्रवास करत असतो, तेव्हा मेंढपाळांवर हल्ले होतात, त्यावर राज्य शासनाने तात्काळ कठोर कायदा आणून मेंढपाळांना संरक्षण देण्याची मागणी

Web Title: Dhangar Leaders met with Chhatrapati Sambhaji Raje will take the initiative for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.