"देवेंद्र फडणवीस माफी मागा, अन्यथा कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही!"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:36 PM2020-05-07T12:36:55+5:302020-05-07T12:43:02+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज तसेच जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत बुधवारी शाहूप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला.

Devendra Fadnavis's tweet angers Shahupremi, apologizes; Otherwise Kolhapur closed | "देवेंद्र फडणवीस माफी मागा, अन्यथा कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही!"

"देवेंद्र फडणवीस माफी मागा, अन्यथा कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही!"

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर शाहूप्रेमींचा संतापमाफी मागा; नाहीतर कोल्हापूर बंद

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचे युग निर्माण केले, ते समाज क्रांतिकारक होते. अशा या राजाला लोकराजा, रयतेचा राजा, राजर्षी अशा अनेक पदव्या असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख करून महाराजांचा अवमान केला आहे. फडणवीस यांनी शाहू महाराज तसेच जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत शाहूप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला.

बुधवारी राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना छत्रपती शाहू महाराज यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला आहे.

ट्विटमध्ये चूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हे ट्विट मागे घेतले. मात्र त्याबद्दल कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यांच्या या ट्विटवर इतिहास संशोधक, शाहूप्रेमी तसेच नागरिकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांना सामाजिक लोकशाहीचे स्तंभ म्हटले आहे. फडणवीस यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा इतिहास समजून घ्यावा. शाहू महाराजांचा देशभर राजर्षी म्हणून उल्लेख केला जात असताना त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणणाऱ्या, वामनी दावा करणाऱ्या फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. फडणवीस जोपर्यंत शाहू महाराज व जनतेची माफी मागत नाहीत, तोपर्यंत संभाजी ब्रिगेड त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही. यासह फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातूनही अनेक शाहूप्रेमींनी व नागरिकांनी फडणवीस यांच्या या ट्विटवर जहरी शब्दांत टीका केली आहे.


शाहू महाराज यांचा हेतुपुरस्सर कार्यकर्ता असा उल्लेख करणे ही महाराजांनी फार मोठी उपेक्षा आहे. शाहू महाराज हे समाज क्रांतिकारक होते. सामाजिक कार्यकर्ते, अनुयायी अनेक असतात; पण क्रांतिकारक फार कमी असतात. शाहू, फुले, आंबेडकर हे क्रांतिकारक होते. फडणवीस यांच्यासारख्या माणसाने शाहू महाराजांचा उल्लेख करताना जबाबदारीने शब्द वापरायला हवे होते.
- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक


समतेचे युगनिर्माता असलेल्या शाहू महाराज यांचा कार्यकर्ता म्हणून उल्लेख करणे म्हणजे त्यांचे अवमूल्यन आहे. शब्दांचे महत्त्व जाणणाऱ्या जबाबदार नेत्याने असा उल्लेख करणे म्हणजे त्यांच्या मनात महाराजांविषयी वेगळ्या भावना आहे. का? भारतातील शाहूप्रेमी हा अवमान खपवून घेणार नाहीत.
- इंद्रजित सावंत,
इतिहास संशोधक
 

Web Title: Devendra Fadnavis's tweet angers Shahupremi, apologizes; Otherwise Kolhapur closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.