सायकलवर चालणार हातपंप, दिव्यागांसाठीचा ‘थर्ड आय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:43 AM2020-01-09T10:43:39+5:302020-01-09T10:47:31+5:30

सायकलवर चालणारा हातपंप आणि ठिंबक सिंचन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठीचा ‘थर्ड आय’, गव्हाच्या पिठापासून बनविलेला चमचा, अपघात रोखणारी स्मार्ट स्ट्रीट लाईट, आदी स्वरूपातील संशोधनाचा ‘आविष्कार’ शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना बुधवारी पाहायला मिळाला.

Cycling hand pumps, light 'third eye' | सायकलवर चालणार हातपंप, दिव्यागांसाठीचा ‘थर्ड आय’

शिवाजी विद्यापीठात आविष्कार संशोधन महोत्सवात विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांगांसाठीचा ‘थर्ड आय’हा चष्मा सादर केला. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात संशोधनाचा ‘आविष्कार’ कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

कोल्हापूर : सायकलवर चालणारा हातपंप आणि ठिंबक सिंचन व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठीचा ‘थर्ड आय’, गव्हाच्या पिठापासून बनविलेला चमचा, अपघात रोखणारी स्मार्ट स्ट्रीट लाईट, आदी स्वरूपातील संशोधनाचा ‘आविष्कार’ शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना बुधवारी पाहायला मिळाला.

शिवाजी विद्यापीठस्तरावरील ‘आविष्कार’ हा संशोधन महोत्सव विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, मध्यवर्ती आविष्कार संशोधन महोत्सवाचे समन्वयक डॉ. एस. बी. महाडिक, डॉ. एस. बी. सादळे, आदी उपस्थित होते.

या महोत्सवात कोरगावच्या डी. पी. भोसले कॉलेजच्या अंकिता जाधव, प्रियांका यादव, शुभम लवळे यांनी टाकाऊ साहित्याच्या वापरातून साकारलेल्या सायकलवर चालणारा हातपंप आणि ठिंबक सिंचन व्यवस्थेचा प्रकल्प मांडला. रामानंदनगर-बुर्ली (ता. पलूस) येथील ए. एस. सी. कॉलेजच्या सत्यम तिरमारे याने अपघात रोखणाऱ्या ‘स्मार्ट स्ट्रीट लाईट’चे संशोधन सादर केले.

विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्सच्या रोहित पाटील आणि सूरज कुंभार यांनी दिव्यांगांसाठीचा ‘थर्ड आय’ हा मोबाईल अ‍ॅपशी जोडण्यात आलेला चष्मा सादर केला. वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेजमधील पूजा माळी हिने प्लास्टिक चमच्याला पर्याय म्हणून गव्हाच्या पिठापासून बनविलेला चमचा सादर केला.

महागाव येथील एस.जी.एम. कॉलेजच्या महेश अंगज, स्वप्नाली घोरपडे यांनी शेतीमध्ये सौरऊर्जा निर्मितीबाबतचे संशोधन मांडले. विविध संशोधन प्रकल्पांसह भित्तीपत्रके मांडली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा पिशवी खोऱ्यातील जलयुक्त शिवार योजनेचा सूक्ष्म अभ्यास, सोशल मीडियाचा वापर, महिला सक्षमीकरण, आदींबाबतच्या भित्तीपत्रकांचा समावेश होता.

विविध संशोधन प्रकल्पांची माहिती विद्यार्थी-विद्यार्र्थिनी बारकाईने घेत होते. सायंकाळपर्यंत त्यांची याठिकाणी गर्दी होती. दरम्यान, युजी, पीजी, पीपीजीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी (पीएडीसाठीची नोंदणी) एकूण २८५ प्रकल्प या महोत्सवात सादर केले. प्रकल्पांची संख्या यंदा वाढली आहे. विविध सहा गटांतील प्रत्येकी तीन विजेत्यांची राज्यस्तरीय महोत्सवासाठी निवड होणार असल्याचे समन्वयक डॉ. सादळे यांनी सांगितले.


समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवसंकल्पना आणि संशोधनाची माहिती या महोत्सवातून मिळाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगले, वेगळ्या विषयांबाबतचे संशोधन या महोत्सवात सादर केले.
-ऐश्वर्या भोसले.


विज्ञान, अभियांत्रिकी, शेती व पशुसंवर्धन, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, अशा विविध क्षेत्रांतील संशोधन या महोत्सवात पाहायला मिळाले. संशोधनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.
-बाळकृष्ण लिमये, कोल्हापूर.


नवसंकल्पना, संशोधनाची गरज

देशाच्या मजबूत बांधणी आणि प्रगतीसाठी नवसंकल्पना, संशोधनाची गरज आहे. समाजातील विविध स्वरूपातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग करण्याचे काम विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवरील संशोधकांकडून व्हावे, असे आवाहन प्र-कुलगुरु डॉ. शिर्के यांनी यावेळी केले.

 

 

 

Web Title: Cycling hand pumps, light 'third eye'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.