पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:02 AM2019-08-19T11:02:51+5:302019-08-19T11:25:23+5:30

पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Criminals on tankers selling water five times over | पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत टॅँकरचे दर अडलेल्या नागरिकांची लूट, पूरपरिस्थितीत हरवली माणुसकी

कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे.

या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या बहुतांश पाणी पुरवठा योजना पाण्यात असून, त्याची दुुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापुरामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे; त्यामुळे शहरासह उपनगरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या काळात थोडी माणुसकी दाखविणे गरजेचे होते; परंतु अशा कठीण काळात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार खासगी टॅँकरवाल्यांकडून सुरू आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत विकला जात आहे.

एका बाजूला शासन प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक पूरग्रस्तांना मदतीचा हात देत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला आपलीच माणसं आपल्या माणसांना लूटत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव या पाचपट दराने लोक पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत.

टॅँकरवाल्यांना मोफत पाणी द्या, असे आम्ही म्हणत नाही, मूळ दरामध्ये १00-२00 वाढवून द्यायलाही हरकत नाही; परंतु अशा पद्धतीने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पाण्याची चालविलेली लूट योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. शहरासह कळंबा, पाचगाव, फुलेवाडी, जाधववाडी, बालिंगा, मोरेवाडी परिसरातील उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे अशा पद्धतीने टॅँकरवाल्यांकडून जादा पैसे आकारणी सुरू आहे.

कृत्रिम बुकिंग दाखवून लूट

पाणीटंचाईच्या काळात टॅँकरसाठी खोटे कृत्रिम बुकिंग दाखवून वाढीव दराने पाण्याचे टॅँकर विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. नागरिकही अशा पद्धतीने वास्तव असेल, या गैरसमजातून वाढीव पैसे मोजत आहेत. ही बाब गंभीर आहे.

 

टॅँकरमालकांकडून अशा पद्धतीने पैसे आकारून नागरिकांची लूट करणे अयोग्य आहे, अशा टॅँकर चालकांची यादी तयार करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्तांनाही त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी


शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर असताना टॅँकरवाल्यांकडून पाचपट जादा दराने पैसे घेणे योग्य नाही. मूळ दरापेक्षा १00-२00 रुपये जादा देण्याची मानसिकता असताना नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
- महेश देसाई, नागरिक


पूर परिस्थितीमुळे गेले १५ दिवस पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाकडे असलेल्या टँकरच्या संख्येत मर्यादा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला; मात्र टँकरमालकांनी याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दर लावून नागरिकांची लूट केली आहे.
- करुणा कांबळे, गृहिणी
 

 

Web Title: Criminals on tankers selling water five times over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.