अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : सामुदायिक विवाहावर उधळपट्टी, कार्यक्रम पक्षाकडून 'हायजॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 01:32 PM2021-12-03T13:32:45+5:302021-12-03T13:33:46+5:30

आत्महत्याग्रस्त-गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी धर्मादाय कार्यालयाने पुढाकार घेतला होता. पण या संस्था बाजूला राहिल्या आणि जंगी विवाह सोहळा राजकीय पक्षाच्यावतीने केला. विवाह सोहळ्यासाठी दिलेला तब्बल १० लाखांचा निधी फक्त मांडवावरच खर्च करण्यात आला.

Corruption of West Maharashtra Devasthan Samiti in community marriage ceremony | अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : सामुदायिक विवाहावर उधळपट्टी, कार्यक्रम पक्षाकडून 'हायजॅक'

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : सामुदायिक विवाहावर उधळपट्टी, कार्यक्रम पक्षाकडून 'हायजॅक'

googlenewsNext

इंदूमती गणेश

कोल्हापूर : देवस्थान समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी दिलेला तब्बल १० लाखांचा निधी फक्त मांडवावरच खर्च करण्यात आला. आत्महत्याग्रस्त-गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी धर्मादाय कार्यालयाने पुढाकार घेतला होता. पण या दोन्ही संस्था बाजूला राहिल्या आणि जंगी विवाह सोहळा राजकीय पक्षाच्यावतीने केला ज्याचा मूळ खर्च फक्त ५ लाख रुपये होता.

देवस्थान समितीने सामाजिक कार्यासाठी २ कोटींची तरतूद केली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ६ मार्च २०१८ ला एक परिपत्रक काढले. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याने त्यासाठी मुलीच्या विवाहाची चिंता हे प्रमुख कारण आहे, तरी धार्मिक स्थळांनी आपल्याकडील काही निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तसेच गरीब घटकातील मुलींच्या विवाहासाठी द्यावा, असे त्यात म्हटले. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची, शैक्षणिक सामाजिक संस्थांची बैठक घेऊन त्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी असे ठरले.

या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांनी, शैक्षणिक-सामाजिक संस्थांनी मिळून निधी देणे अपेक्षित असताना ‘देवस्थान’नेच तब्बल १० लाखांचा निधी सामुदायिक विवाह समितीला दिला. ज्या समितीचे अध्यक्ष भाजपचे पदाधिकारी होते. तीन धर्मादाय सहआयुक्त व अन्य चारजण सदस्य होते. एप्रिलमध्ये रक्कम दिली, मेमध्ये जंगी विवाह सोहळा झाला जो पक्षाच्यावतीनेच केला गेला असे दाखवण्यात आले. या सोहळ्यासाठी धर्मादायला आपण निधी द्यायचा आहे एवढेच आम्हाला सांगण्यात आले. त्याचे नियोजन कोणी केले, कसे केले, पक्षाकडून हा कार्यक्रम कसा काय झाला, याची आम्हाला काहीही कल्पना दिली गेली नाही असे समितीच्या अन्य सदस्यांचे म्हणणे आहे.

आयजीच्या जीवावर बायजी...

या सोहळ्यासाठी सुरुवातीला धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला, ७५ टक्के निधी देवस्थान समितीने दिला पण अंतिम सोहळा पक्षाच्यावतीने झाला. यात पक्ष व संबंधितांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरही अक्षता पडल्या. त्यात शेतकऱ्यांच्या व खरंच गरजू कुटुंबातील मुली किती होत्या हा भाग स्वतंत्र चौकशीचा आहे. त्यामध्ये आयजीच्या जीवावर बायजी उदार असा व्यवहार झाला आहे.

एकूण खर्च १५ लाख

या सोहळ्यासाठी एकूण १७ लाखांवर रक्कम जमा झाली. त्यापैकी मांडवावरच समितीचे १० लाख रुपये खर्च करण्यात आले. ६ मे २०१८ ला झालेला या सोहळ्यात ६० जणांचे विवाह झाले ज्याचा एकूण खर्च १५ लाख आहे. उरलेले २ लाख ३२ हजार रुपये ५८ नवदाम्पत्यांना प्रत्येकी ४ हजार रुपयेप्रमाणे देण्यात आले. निधी नसल्याने उरलेल्या दोन दाम्पत्यांना दिलेच नाहीत.

अंबाबाई तुमच्या पाठीशी

देवस्थान भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी ही मालिका सुरू झाली तेव्हापासून वाचकांकडून रोज प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी दूरध्वनीवरून अन्य गैरव्यवहारांची माहिती दिली. उघड गुपित असलेल्या प्रकरणांवर धाडसाने मालिका लिहिली याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन केले. देवीच्या साड्या गायब यावर तर महिलांनीही तीव्र शब्दात मत मांडले.

Web Title: Corruption of West Maharashtra Devasthan Samiti in community marriage ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.