CoronaVirus : आठवड्याभरात १० हजारांवर नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:16 PM2020-06-05T15:16:04+5:302020-06-05T15:18:25+5:30

जिल्ह्यात एकवेळ अशी आली की जिल्ह्यातील ज्या १९ ठिकाणी नागरिकांचे स्वॅब घेण्याची सोय आहे तेथील फ्रीजर नमुन्यांनी भरलेले होते. शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेतही ३ हजारांहून अधिक स्वॅबचे नमुने प्रलंबित होते; परंतु अक्षरश: २४ तास काम करत येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेमध्ये केवळ ७ दिवसांत १० हजारांहून अधिक स्वॅबची तपासणी केली आणि नागरिकांना दिलासा दिला.

Coronavirus: Tests on 10,000 samples in a week | CoronaVirus : आठवड्याभरात १० हजारांवर नमुन्यांची तपासणी

CoronaVirus : आठवड्याभरात १० हजारांवर नमुन्यांची तपासणी

Next
ठळक मुद्देआठवड्याभरात १० हजारांवर नमुन्यांची तपासणीशेंडा पार्क प्रयोगशाळेची कामगिरी

समीर देशपांडे

कोल्हापूर -जिल्ह्यात एकवेळ अशी आली की जिल्ह्यातील ज्या १९ ठिकाणी नागरिकांचे स्वॅब घेण्याची सोय आहे तेथील फ्रीजर नमुन्यांनी भरलेले होते. शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेतही ३ हजारांहून अधिक स्वॅबचे नमुने प्रलंबित होते; परंतु अक्षरश: २४ तास काम करत येथील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेमध्ये केवळ ७ दिवसांत १० हजारांहून अधिक स्वॅबची तपासणी केली आणि नागरिकांना दिलासा दिला.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हजारो नागरिक मुंबई, पुण्याहून गावाकडे येऊ लागले. सुरुवातीच्या काळामध्ये पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेमध्ये नमुने तपासणीसाठी पाठिवले जाऊ लागले. तेथील ताण वाढला आणि अहवाल विलंबाने मिळू लागले. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून शेंडा पार्क येथे तातडीने प्रयोगशाळा उभारली.

१ एप्रिल २०२० रोजी पहिला नमुना या ठिकाणी तपासण्यात आला. दरम्यानच्या काळात मुंबई, पुण्यासह बाधित जिल्ह्यांतून येणाऱ्या सर्वच नागरिकांचे स्वॅब तपासण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

रोज हजारो नागरिक जिल्ह्यात आले. स्वॅब घेण्यासाठी रांगा लागल्या. ज्या १९ ठिकाणी स्वॅब घेण्याची सोय केली होती तेथे दिवस-दिवसभर हजारो नागरिक स्वॅबसाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसू लागले. हीच परिस्थिती स्वॅब तपासणीच्या बाबतीतही झाली.

शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेवर या सर्व नमुने तपासणीचा ताण पडला. परिणामी तपासणीला विलंब होऊ लागला. एकाचवेळी ६ हजारांहून अधिक नमुने तपासणीसाठी प्रलंबित राहिले. जोपर्यंत अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत नागरिकांना घरी सोडले जात नव्हते. परिणामी संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्यांना सोयी-सुविधा देताना प्रशासनाच्या नाकीनऊ येऊ लागले.

अहवाल प्रलंबित राहून ती संख्या वाढतच निघाल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांची प्रयोगशाळेकडे समन्वयासाठी नियुक्ती केली. स्वॅब घेतल्यापासून ते प्रयोगशाळेत येईपर्यंत आणि तेथून तपासाणी होऊन अहवाल येईपर्यंतच्या प्रक्रियेची नव्याने आखणी करण्यात आली.

नोंदीसाठी वापरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करण्यात आला. सीबीनॅटसह आरटीपीसीआर मशीनचाही वापर सुरू करण्यात आला. या ठिकाणच्या डॉक्टरांसह, तांत्रिक सहाय्यकांनीही सलग २४/२४ तास काम सुरू केले आणि केवळ आठवड्याभरात १०१६५ नमुन्यांची तपासणी केली. सलग सात दिवसांमध्ये या सर्व नमुन्यांची तपासणी झाली आणि हे काम आवाक्यात आणले गेले.


यांनी केली कामगिरी
डॉ. स्मिता देशपांडे, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. हेमंत वाळके, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ शिल्पा पुट्टा, डॉ. रजनी चव्हाण, डॉ. अश्विनी राजमाने यांच्यासह तांत्रिक काम पाहणारे प्रेमजित सरदेसाई, मेघा म्हेत्रस, शमा गडकरी, शरयू साळोखे, अश्विनी देसाई यांनी युद्धपातळीवर हे काम केले.

संख्या वाढली, पण धोका कमी झाला

शासनाच्या सूचना नसताना नागरिकांचे सरसकट स्वॅब घेतल्याबाबत मंत्रालयातून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आक्षेपही घेण्यात आले. मात्र, जास्त तपासणी झाल्याने आकडा वाढला असला तरी त्यामुळे सामूहिक संसर्ग होऊ शकला नाही हे देखील वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे.

Web Title: Coronavirus: Tests on 10,000 samples in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.