Maharashtra Vidhan Sabha 2019:आटपाडीचा आमदार ठरले दिवास्वप्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 03:05 PM2019-10-05T15:05:10+5:302019-10-05T15:45:02+5:30

अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे आज तरी आटपाडीचा आमदार, हे दिवास्वप्न ठरल्याचे मानले जात आहे.

Atapadi MLA becomes daydream! | Maharashtra Vidhan Sabha 2019:आटपाडीचा आमदार ठरले दिवास्वप्न !

Maharashtra Vidhan Sabha 2019:आटपाडीचा आमदार ठरले दिवास्वप्न !

Next
ठळक मुद्देआटपाडीचा आमदार ठरले दिवास्वप्न!देशमुख बंधू उमेदवारी अर्ज न भरण्याच्या भूमिकेवर ठाम

अविनाश बाड 

आटपाडी : अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे आज तरी आटपाडीचा आमदार, हे दिवास्वप्न ठरल्याचे मानले जात आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून १९९५ मध्ये अपक्ष म्हणून आमदार झालेले राजेंद्रअण्णा देशमुख यांचा अपवाद वगळता, या तालुक्याचा आमदार झालेला नाही. खानापूर तालुक्याचा आमदारकीबाबत कायम वरचष्मा राहिला आहे.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत तालुक्याचा दुष्काळ, टेंभू योजना, पिण्याचे आणि शेतीचे पाणी याबरोबरच तालुक्याचा आमदार हा मुद्दा ऐरणीवर येतो. तसा या निवडणुकीआधीही हा मुद्दा गाजला. गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तर सगळ्याच पक्षांचे नेते आक्रमक आणि कमालीचे आग्रही दिसले.

तुल्यबळ उमेदवार द्यावा म्हणून अनेकांनी अमरसिंह देशमुख किंवा राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह केला. पण अमरसिंह देशमुख यांनी मी किंवा माझ्या घरातील कुणीही उमेदवारी करणार नाही, तालुक्यातला कोणताही उमेदवार ठरवा, असा आग्रह केला.

पण लोक ऐकत नव्हते. मग शेवटी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता कॉँग्रेसचे नेते राजाराम देशमुख यांनी तालुक्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्याची जबाबदारी घेतली. त्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांची बैठक कधी होणार आणि निर्णय काय होणार, याची उत्सुकता होती. सायंकाळी राजाराम देशमुख यांनी सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक नेते परगावी असल्याने बैठकच होऊ शकली नाही.

बैठक होत नाही म्हटल्यावर अमरसिंह देश्मुख यांनी तालुक्यातील सर्व इच्छुकांना संपर्क साधून, तुम्हाला योग्य वाटते ते करा, अर्ज भरा, तुमचा मार्ग मोकळा आहे, असे सांगितले. शुक्रवारी सकाळी देशमुख गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले. पुन्हा आग्रह झाला. पण देशमुख बंधू उमेदवारी अर्ज न भरण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि पुन्हा एकदा आटपाडीचा आमदार करण्याचा प्रयोग फिसकटला.

Web Title: Atapadi MLA becomes daydream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.