एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा जिल्ह्यात कार्यशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:20+5:302021-01-22T04:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा केवळ पाट्या न टाकता, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय, ...

एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा जिल्ह्यात कार्यशील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा एडस् नियंत्रण समितीची यंत्रणा केवळ पाट्या न टाकता, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय, या भावनेतून जिल्ह्यात काम करीत आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी काढले.
इंडो काऊंट फौंडेशनच्या सहकार्याने ‘सीपीआर’मधील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी फौंडेशनच्या वतीने समितीला १२ संगणक आणि १२ फ्रिज देण्यात आले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, या कार्यालयाची यंत्रणा स्वत: झोकून देऊन काम करीत असते. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून फौंडेशनही काम करीत आहे. आरोग्य विभागाने जिल्हाभर एखादी मोठी मोहीम फौंडेशनच्या माध्यमातून राबवावी.
फौंडेशनचे संचालक कमल मित्रा म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाची प्रेरणा घेऊन कार्डियाक विभागातील महिला विभागाचे आणि या कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. कोल्हापूरमधूनच आम्ही मोठे झालो आहोत. या शहराच्या विकासात हातभार लावताना मला निश्चितच आनंद होत आहे.
यानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत कोरोना काळात महिन्याला पाच हजार याप्रमाणे ३१२ सेक्स वर्कर महिलांना व त्यांच्या शाळेत जाणाऱ्या १२ मुलांना महिना अडीच हजार रुपये अशी मदत देण्यात आली. त्याबाबत जिल्हाधिकारी आणि समितीचे विशेष आभार मानण्यात आले.
जिल्हा कार्यक्रमाधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. विलास देशमुख डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. जी. काटकर उपस्थित होते.
---
फोटो नं २१०१२०२१-कोल-एडस नियंत्रण समिती
ओळ : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामधील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी व इंडो काऊंट फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
--