Agriculture in Kolhapur region hit Rs 3,500 crore | कोल्हापूर विभागातील शेतीला साडेतीन हजार कोटींचा फटका
कोल्हापूर विभागातील शेतीला साडेतीन हजार कोटींचा फटका

- वसंत भोसले
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत. यामुळे प्रती एकरी सरासरी किमान ७० हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तरी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका साडेपाच लाखांवर शेतकऱ्यांना बसला आहे. यात जिरायती, बागायती क्षेत्रांतील पिकांसह फळबागांचा समावेश आहे.

अजून पंचनामे झाले नसले, तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार, कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाºया तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे झाल्याचे दिसत आहे, त्या खालोखाल सातारा आणि त्यानंतर सांगलीचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऊसाचेच १,२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच संततधार बरसलेल्या पावसामुळे तीन जिल्ह्यांतील महापुराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत घरादारांसह आजूबाजूची शेतीही कवेत घेतली. नदीकाठच्या पिकांसह जवळपास दीड-दोन किलोमीटर परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली. सलग पडणारा पाऊस आणि आठ दिवसांहून अधिक काळ महापुराच्या पाण्यात ही पिके राहिल्याने पूर्णपणे कुजली आहेत, यात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग या प्रमुख पिकांसह कडधान्य पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सर्वाधिक फटका ऊस आणि भात पिकाला बसला आहे.

कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात जिरायती, बागायती आणि फळ पीक असे हेक्टरनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. जिरायतीमध्ये दोन लाख ५१ हजार ८१४ शेतकºयांचे ७२ हजार ६२२ हेक्टरवरील पिके पूरबाधित आहे. बागायतीमध्ये दोन लाख ८६ हजार १९९ शेतकºयांचे एक लाख १५ हजार १३ हेक्टरवरील पीक बाधित आहे. फळपिकांमध्ये समाविष्ट असलेल्या केळी, द्राक्षांसह अन्य फळपिकांचे २६ हजार ३४९ शेतकºयांचे एक लाख १७0८ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.

नुकसानीचा आकडा वाढणार
कितीही कमी उत्पादन झाले तरी तरी एकरी किमान सरासरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागतेच. ऊस तसेच अन्य बागायती पिकांचे, फळबांगाचे उत्पन्न यापेक्षा कितीतरी अधीक असते. त्यामुळे नुकसानीचा हा आकडा साडेतीन हजार कोटी रुपयापेक्षांही अधिक असू शकतो.


Web Title: Agriculture in Kolhapur region hit Rs 3,500 crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.