अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 12:38 PM2021-11-25T12:38:53+5:302021-11-25T12:41:41+5:30

राजाराम लोंढे कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस , महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले ...

Additional reserves in Kolhapur district dam this year too | अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी थांबली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात यंदाही..

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ऑक्टोबरपर्यंत राहिलेला परतीचा पाऊस, महापुरानंतर खंडित वीज पुरवठ्यामुळे बंद असलेला उपसा आणि आता गेले दहा दिवस जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची मागणी पूर्णपणे थांबली आहे. नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील प्रमुख धरणात तब्बल ९५.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा थोडा अधिक आहे. त्यामुळे यंदाही धरणात पाण्याचा अतिरिक्त साठा राहणार असून, पावसाळ्यापूर्वी त्याचे नियोजन करावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मान्सूनने आपला वेग वाढवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत काही महिन्यांत कमी-अधिक प्रमाणात कोसळत राहिला. यंदा तर जुलै महिन्यात आठ दिवसातच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. अवघ्या चार-पाच दिवसातच महापूर आणला. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. २०१९च्या महापुराचा विळखा लक्षात घेऊन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने एप्रिलपासूनच धरणातील पाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महापुराची अधिक झळ बसली नाही.

जिल्ह्यात १४ लहान-मोठी धरणे असून, धरणक्षेत्रात सरासरी ४,०१९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरापरीपेक्षा अधिक पाऊस झाला. साधारणत: ऑक्टोबरपासून रब्बीचा हंगाम सुरु होतो, त्यातच ऑक्टोबरपासून ऊसासह इतर पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने नदीतील पाण्याचा उपसा वाढतो. यंदा मात्र निम्मा ऑक्टोबर महिना परतीच्या पावसात वाहून गेला. परतीचा पाऊस थांबल्यानंतर नदीवरील विद्युत पंप बसले खरे मात्र महापुरामुळे विद्युत खांब पडल्याने विजेअभावी उपसा होऊ शकला नाही. शेतकऱ्यांनी महावितरणकडे पाठपुरावा करुन वीज सुरु केली, तोपर्यंत अवकाळी पाऊस सुरु झाला. गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठिय्या मारल्याने शेतकऱ्यांची पाण्याची मागणी शून्य टक्क्यावर आली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा व आगामी सात महिन्यांत लागणारे पाणी याचा ताळेबंद पाहिला तर किमान २५ टक्के पाणीसाठा अतिरिक्त होऊ शकतो. या साठ्याचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागणार आहे.

पंधरा दिवसांनी पाण्याची मागणी होणार

जिल्ह्यात अजून पाऊस सुरु आहे. आगामी चार-पाच दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी जमिनीला वापसा येणार नाही. त्याचबरोबर ३० नाेव्हेंबर ते २ डिसेंबर या तीन दिवसात जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची गरज डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागेल.

राधानगरी’, ‘कासारी’त साठा अधिक

गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा पाहिला तर राधानगरी, कुंभी व कासारी धरणांत तुलनेत अधिक साठा आहे. पाटगाव, कुंभी, कडवीमध्ये गेल्यावर्षी एवढाच आहे.

धरणातील पाणीसाठा ‘टीएमसी’मध्ये असा, कंसात टक्केवारी -

राधानगरी - ७.१७ (९२)

तुळशी - ३.०९ (९५)

वारणा - ३१.३० (९१)

दूधगंगा - २१.५५ (९०)

कासारी - २.७२ (९९)

कडवी - २.४४ (९८)

कुंभी - २.६५ (९८)

पाटगाव - ३.६४ (९९)

वारणा - २४.९१ (९१)

दूधगंगा - २१.५५

Web Title: Additional reserves in Kolhapur district dam this year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.