3 doctors from Thane to Kolhapur, Sangli Patient Services | ठाण्यातील १०० डॉक्टरांची कोल्हापूर, सांगलीत रुग्णसेवा

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शिबिराला भेट दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. जे. बी. भोर, मंगेश चिवटे उपस्थित होते.

ठळक मुद्देठाण्यातील १०० डॉक्टरांची कोल्हापूर, सांगलीत रुग्णसेवाएकनाथ शिंदे यांची चोख यंत्रणा, पूरग्रस्त भागांत दहा दिवस ठोकला तळ

कोल्हापूर : एखाद्या नेत्याने मनात आणले तर काय करता येते, याचे उत्तम उदाहरण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घालून दिले आहे. स्वत: १० दिवस कोल्हापूर आणि सांगलीत तळ ठोक णाऱ्या शिंदे यांनी दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील १०० डॉक्टरांचे पथक या दोन्ही जिल्ह्यांत १० दिवसांसाठी कार्यरत ठेवले आणि पूरग्रस्त गावांमध्ये कार्यरत असणाऱ्या शासनाच्या आरोग्यसेवेला मोठे बळ दिले.

महापूर आल्यानंतर शिंदे यांनी या दोन्ही जिल्ह्यांत मुक्काम ठोकला. शासनाच्या आरोग्य खात्याची यंत्रणा एकीकडे कामाला लावतानाच त्यांच्या लक्षात आले की, हे काम केवळ शासकीय यंत्रणेला झेपणार नाही.

पूर ओसरल्यानंतर या विभागाचे काम एकदम वाढणार आहे. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांना आवाहन केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वय मंगेश चिवटे आणि डॉ. जे. बी. भोर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १०० डॉक्टरांचे पथक १२ आॅगस्टला कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले.

गेल्या १० दिवसांमध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, शाहूवाडी, कोल्हापूर शहर, पलूस, वाळवा, इचलकरंजी परिसरांतील ७२ गावांमध्ये त्यांनी वैद्यकीय शिबिरे घेतली. ४२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. सव्वादोन कोटी रुपयांच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. ५००० डेंग्यू किटस्चे वितरण करण्यात आले. या तपासणीदरम्यान अ‍ॅनिमिया, मलेरिया आणि त्वचारोग झालेले अनेक रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. या सर्व डॉक्टरांच्या मदतीसाठी शिवसेनेचे १२० पदाधिकारीही त्यांच्यासमवेत होते.

त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने या पथकाचा सत्कारही करण्यात आला. अतिशय गरजेच्या वेळी आम्हांला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत येऊन काम करता आले, याचे समाधान असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.

खासदारांकडूनही रुग्णतपासणी

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवीत असताना स्वत: खासदार श्ािंदे या शिबिरांमध्ये रुग्णतपासणी करीत होते. खासदार राजन विचारे यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.


 

Web Title: 3 doctors from Thane to Kolhapur, Sangli Patient Services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.