जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना १३ कोटी ८४ लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:18 PM2020-02-29T17:18:59+5:302020-02-29T17:23:25+5:30

आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

1 crore 2 lakh compensation to the agricultural holders of the district | जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना १३ कोटी ८४ लाखांची भरपाई

राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना निवेदन देण्यात आले.

Next
ठळक मुद्देमहावितरणचा मुख्यमंत्र्यांकडे सुधारित प्रस्ताव सादरमंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, ही नुकसानभरपाई कधी मिळणार अशी विचारणा करत इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन चर्चा केली. आठ दिवसांत नुकसानभरपाई न जमा झाल्यास महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलनास बसू, असा इशाराही दिला.

आॅगस्टमध्ये झालेल्या महापुरात कृषीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मोटारी, केबल, ट्रान्स्फॉर्मरही वाहून गेले होते. गाळात रूतले होते. याचे पंचनामे महावितरणकडून करण्यात आले होते. तथापि, आजतागायत याची नुकसानभरपाई संबंधित कृषीपंपधारकांना मिळालेली नाही. याशिवाय या काळात मोटारी आणि वीजप्रवाहही बंद असतानादेखील महावितरणकडून कृषीपंपाचे सरासरी बिल काढले आहे. ही दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी करूनही अधिकारी, कर्मचारी दाद देत नसल्याचे दिसते.

यावर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा बैठक घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. इरिगेशन फेडरेशनने पाचवेळा भेट घेऊन समस्या मांडल्या, पण काहीही उपयोग होत नसल्याने आता चर्चा बस्स, आंदोलनच करायचे असे ठरवून इशारा देणारे निवेदन तयार केले. शुक्रवारी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील, सुभाष महापुरे, आर. के. पाटील यांनी अधीक्षक अभियंता कावळे यांची भेट घेऊन त्यांना इशारा निवेदन दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत कावळे यांनी आम्ही महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले आहेत, पण आजपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यास आम्ही शून्य वीजबिलासह, बिल दुरुस्ती व अन्य नुकसानभरपाईचा निर्णय घेऊ, असे सांगितले. शासनाच्या मागणीनुसार नवीन प्रस्ताव पाठविला आहे, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे सुधारित प्रस्ताव

सुरुवातीला साडेपंधरा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकेपणे प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याने नवीन १३ कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी पाठविला आहे. यात ट्रान्स्फॉर्मरसाठी २ कोटी ३८ लाख, डीपीसाठी १ कोटी ९३ लाख, एचटी केबल ४२ लाख, मोटार ६८ लाख, एलटी केबल ५ कोटी ५२ लाख, स्टार्टर ५८ लाख असा समावेश आहे.

मोटार बंद असतानाही वाढीव बिल आले कसे?

या बैठकीत पाडळीचे कृषीपंपधारक गुणाजी जाधव यांनी दत्त पाणीपुरवठा संस्थेचे जूनमधील बिल ४ लाख ३ हजारांचे होते. पावसाळ््यात मोटार बंद असतानाही दोन महिन्यांपूर्वी ५ लाख ८३ हजारांचे बिल पाठविले आहे. दोन महिन्यांत १ लाख ८२ हजार कसे काय वाढले, ते सांगा असा प्रतिप्रश्नच अधीक्षक अभियंत्यांना केला. यावर अभियंता कावळे यांनी तक्रारी द्या, कारवाई करू असे सांगितले.

 

 

Web Title: 1 crore 2 lakh compensation to the agricultural holders of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.