लाखोंचा दारूसाठा जप्त, टेम्पोचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:26 AM2020-11-24T00:26:19+5:302020-11-24T00:26:30+5:30

टेम्पोचालकास अटक ; मुख्य आरोपी फरार

Lakhs of liquor seized | लाखोंचा दारूसाठा जप्त, टेम्पोचालकास अटक

लाखोंचा दारूसाठा जप्त, टेम्पोचालकास अटक

Next

डोंबिवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवलीच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा कल्याण-शीळ रोड मार्गावरील सोनारपाडा, उसरघर परिसरातून टेम्पो आणि ट्रकसह २८ लाख ७८ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टेम्पोचालक दीपक बोर्डे (वय २६) याला अटक केली असून, मुख्य आरोपी फरार आहे.

डोंबिवली विभागाचे दारूबंदी उत्पादन शुल्क निरीक्षक अनिल पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री त्यांच्या पथकाने कल्याण-शीळ रोडवरील आर्या लॉजबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोची तपासणी केली असता त्यात १८० मि.लीटरच्या विदेशी बनावट मद्याच्या १२०० बाटल्या आढळून आल्या. हा दारूसाठा आणि टेम्पो जप्त करून टेम्पोचालक बोर्डेला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तीन लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बोर्डेकडे चौकशी करता त्याने विदेशी मद्य उसरघर येथून आणल्याची माहिती पथकाला दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार उसरघर गावातील वीटभट्टीजवळ उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यात व्हिस्कीच्या १८० मि.लीटरच्या तब्बल १६ हजार ५६० बाटल्या आणि एका मद्य कंपनीची बनावट लेबल त्याठिकाणी आढळून आली. ट्रकसह दारूसाठा असा २५ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला. असा एकूण २८ लाख ७८ हजार ४० रुपयांचा हा मुद्देमाल असून आरोपी बोर्डेला रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल पवार, मल्हारी होळ, विश्वजित आभाळे, सुनील कोळी, दीपक खडसे, दीपक दळवी, शिवराम जाखिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Lakhs of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.