जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:32 AM2021-05-10T09:32:45+5:302021-05-10T09:38:59+5:30

आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे.

The highest use of remedicivir injection in the district is in the hospitals at Kalyan-Dombivali | जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

Next


सुरेश लोखंडे - 
ठाणे : रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या मनमानी वापरामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये आधीच चिंता व्यक्त केली जात असताना, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा जवळपास  ९० टक्के वापर‌ केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील अन्य शहरांंच्या तुलनेत कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ७२ रुग्णालयांचा समावेश असल्याचे अहवालाअंती उघड झाले आहे.

आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये नियमास अनुसरून २५ तर ३० टक्के रुग्णांसाठीच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर होत आहे. या इंजेक्शन्सच्या मनमानी वापरामुळे जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा झाला. मात्र, आता रुग्णवाढीचे व रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाल्यामुळे या औषधींचा पुरवठाही सुरळीत होत असल्याचे अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त पी.बी. मुंदडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आयसीएमआरच्या निकषास अनुसरून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत ५० टक्के पुरवठा नेहमीप्रमाणे होत असल्याचेही मुंदडा यांनी सांगितले. जिल्हाभरातील रुग्णालयांनी आतापर्यंत एक लाख एक हजार ७२० रेमडेसिविरची मागणी नोंदवलेली आहे. त्यातुलनेत ५१ हजार‌ ६८५ इंजेक्शन मेडिकलऐवजी सरळ रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत. यातील २ हजार २६० इंजेक्शनचा २२६ रुग्णालयांना शुक्रवारी पुरवठा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक इंजेक्शन्स कल्याण - डोंबिवली शहरातील ७२ रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत. या शहरांमधून ५ मेपर्यंत ३२ हजार २७८ इंजेक्शनची मागणी नोंदवली असून, जिल्ह्यात सर्वात जास्त तब्बल १४ हजार ६६९ इंजेक्शनच्या पुरवठा या शहरात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये ६ ते ८ मेच्या पुरवठ्याचा समावेश केल्यानंतरही या शहरात सर्वाधिक रेमडेसिविरचा वापर होत असल्याचे उघड होत आहे.

नवी मुंबई- मीरा भाईंदर द्वितीय-तृतीय क्रमांकावर
कल्याण-डोंबिवलीच्या खालोखाल गेल्या २० दिवसांत नवी मुंबईतील २९ रुग्णालयांनी ८ हजार ८२८ इंजेक्शनचा वापर केला आहे. त्यांनी १९ हजार ७४९ इंजेक्शनची मागणी केली होती. जिल्ह्यात रेमडेसिविरचा वापर करणाऱ्या शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून मीरा भाईंदर समोर आले आहे. या शहरातील ३२ रुग्णालयांनी ११ हजार ६१५ इंजेक्शनची मागणी केलेली आहे. त्यापैकी त्यांना ४ हजार ९७७ इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. या तुलनेत ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रातील ३५ रुग्णालयांनी ४ हजार २६४ इंजेक्शनची मागणी नोंदली असता त्यांना १ हजार ७७५ इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.

नातेवाइकांचा आग्रह - डाॅ. ओक 
टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटिंग या पद्धतीने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. पण आजही आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्याशिवाय रुग्णाला सुटी दिली जात नाही, अशी खंत कोरोनाच्या राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी व्यक्त केली. रेमडेसिविरच्या अतिवापराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरचा आग्रह धरू लागले आहेत. त्यांचा रोष ओढावून घेण्याऐवजी रेमडेसिविर लावणे डाॅक्टर पसंत करीत असल्याचे वास्तव डाॅ. ओक यांनी मांडले.
 

Web Title: The highest use of remedicivir injection in the district is in the hospitals at Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.