"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 16:41 IST2025-12-07T16:27:24+5:302025-12-07T16:41:39+5:30
शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील वादावर पडदा पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच डोंबिवलीत निधीवरुन जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
Ravindra Chavan VS Shrikant Shinde: पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीच्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवलीतील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे एकत्र आले होते. या कार्यक्रमात कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना कल्याण डोंबिवलीच्या निधीवरुन रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळाला असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलं. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळायला सुरुवात झाल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. डोंबिवली येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर आले असता, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत राजकीय वातावरण तापवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन पार पडले. याच सोहळ्यात बोलताना दोन्ही नेत्यांमध्ये निधी आणि श्रेयवादावरून जोरदार जुंपली.
भाषणादरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या विरोधकांना टोला लगावत म्हटले की, "खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी अनेक जणांनी आजवर खड्डे खोदले, पण हा श्रीकांत आजवर कोणत्याही खड्ड्यात पडला नाही. उलट ज्यांनी हे खड्डे खणले, त्यांची अवस्था काय झाली हे सर्वांना माहिती आहे." महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पदाधिकारी फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदे यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे.
निधीवरून श्रेयवादाची लढाई
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी निधी आणण्याचे श्रेय भाजप-युतीच्या पूर्वीच्या सरकारला दिले. "हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि २०१४ च्या नंतरचा जो काळ होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री झाले आणि मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएचा निधी हा ठाणे जिल्ह्यातील विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची सुरुवात त्या काळात झाली," असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर
यावर श्रीकांत शिंदे यांनी त्वरित पलटवार करत सध्याच्या सरकारने दिलेल्या निधीवर जोर दिला. "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमाने कल्याण डोंबिवलीतील अनेक विकासकामे पार पडत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत निधी यायला सुरुवात झाली. २०१४ मध्ये मला पहिल्यांदा खासदार केलं. २०१४ च्या अगोदरची आणि आताची परिस्थिती कल्याण डोंबिवलीमधील लोक पाहत आहेत," असे सांगत त्यांनी सध्याच्या नेतृत्वाने अधिक निधी आणल्याचे स्पष्ट केले.