डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:30 PM2021-10-21T19:30:52+5:302021-10-21T19:33:07+5:30

Dombivali News : दर महिन्यात दोन ते तीन वेळा या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्यानंतर तीन-चार दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे.

Citizens angry over bad roads and other problems in Dombivli | डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त 

डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त 

googlenewsNext

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एमआयडीसी निवासी विभागातील नागरिक गेली अनेक वर्षे खड्डेमय रस्ते, अनियमित/अनियंत्रित पाणी पुरवठा, प्रलंबित मलनिस्सारण रचना, विजेचा लपंडाव आणि स्वच्छता या महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यांच्या या सर्व मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसून परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या समूहाने या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांसोबत चर्चा करून या परिस्थितीबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या रविवारी येथील नागरिक मूक आंदोलन करणार असून, कोविडच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तशा सूचना नागरिकांना वेळोवेळी देण्यात येत आहेत. सर्व नागरिक रस्त्याच्या दुतर्फा दहा दहा फुटाच्या अंतरावर निषेध फलक घेऊन उभे राहतील अशी रचना करण्यात आली आहे. आंदोलनासाठी डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग दक्ष नागरिक मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून हा मंच पूर्णतः अराजकीय असून, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन दबावगट म्हणून काम करणाऱ्या नागरिकांचा समूह असल्याची माहिती  दक्ष नागरिक मंचचे  विजय मेटकर, अतुल रायकर,  वैभव जोशी आणि अतुल  मोडक यांनी दिली. 
        
दर महिन्यात दोन ते तीन वेळा या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्यानंतर तीन-चार दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. खड्डेमय रस्ते ही समस्या तर पूर्ण डोंबिवलीची असून इथल्या नागरिकांनी गेले अनेक वर्षे याबाबत आवाज उठवला आहे. अनेक वेळा रस्त्यांसाठी निधी मिळाल्याच्या बातम्या नागरिकांपर्यंत येतात पण महापालिका आणि MIDC यांच्याकडे पाठपुरावा केला असता याबाबतची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात त्यांचा वेळ जातो असा अनुभव येथील नागरिकांना आला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून  व्यक्त होत आहेत.
 

Web Title: Citizens angry over bad roads and other problems in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.