देवासारखं धावून आलं 'बालक मंदिर'; ऑनलाईन शाळेसाठी गरीब-गरजू चिमुकल्यांना दिले मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:06 PM2021-08-13T16:06:06+5:302021-08-13T16:08:28+5:30

काही विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही असे विद्यार्थी मोबाईलविना शिक्षणापासून वंचित होते. कल्याणमधील बालक मंदिर शाळेने गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत मोबाईलचे वाटप केले

Balak Mandir School in Kalyan distributed free mobiles to poor children for online education | देवासारखं धावून आलं 'बालक मंदिर'; ऑनलाईन शाळेसाठी गरीब-गरजू चिमुकल्यांना दिले मोबाईल

देवासारखं धावून आलं 'बालक मंदिर'; ऑनलाईन शाळेसाठी गरीब-गरजू चिमुकल्यांना दिले मोबाईल

googlenewsNext

कल्याण- कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून फी भरण्यावरून  हायफाय इंग्रजी शाळांचे अनेक वाद  समोर आले आहेत. इतकंच नाही तर फी अभावी अनेक विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविण्यापर्यंत शाळांची मजल गेली. मात्र कठीण काळात मराठी शाळाचं  गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचं कल्याणमध्ये पाहायला मिळाले आहे. मोबाईलविना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून कल्याण मधील " बालक मंदिर " ही शाळा देवासारखी विद्यार्थ्यांसाठी  धावून आली आहे. या शाळेने गरीब - गरजू चिमुकल्यांना  मोबाईल उपलब्ध करून देत  शिक्षण क्षेत्रात नवीन आदर्श निर्माण केला आहे. 

कोरोना संकटामुळे सर्व चित्रच पालटून गेलं. नोक-या गेल्या,  सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला. त्यात मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण पद्धत रूढ झाली आणि पालकांची डोकेदुखी आणखी वाढली. एकीकडे आर्थिक अडचण आणि दुसरीकडे पाल्याचं शिक्षण या विचित्र परिस्थितीत पालक अक्षरक्ष: हतबल झाले. फी च्या मुद्द्यावरून अलीकडच्या काळात इंग्रजी शाळांमधील अनेक वाद चव्हाट्यावर आले. मराठी शाळा नको , इंग्रजी शाळेतच मुलांच शिक्षण झालं पाहिजे असा  अट्टाहास धरणा-या पालकांवर शाळांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मात्र यापलीकडे जाऊन आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक शाळांमध्ये असलेल्या बालक मंदिर संस्थेनं कठीण काळात विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. 

काही विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही असे विद्यार्थी मोबाईलविना शिक्षणापासून वंचित होते. ही बाब बालक मंदिर शाळेच्या निदर्शनास आल्यावर मग शाळेने जुने स्मार्टफोन देण्यासह आर्थिक मदतीचे आवाहन केले. आणि मग शाळेच्या अनेक माजी विद्यार्थी, हितचिंतक यांच्यासह अनेक जणांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही उणीव भरून काढली. या सर्वांच्या मदतीतून जमा झालेल्या निधीतून मग शाळेने तब्बल 35 नवे कोरे मोबाईल गरजू विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केले. मोबाईल हातात मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसांडून वाहात  होता. शिक्षकांच्या डोळ्यातही  यावेळी आनंदाश्रू तरळले.

बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात हा  हृदयस्पर्शी  सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे.जे.तडवी, युवा अन स्टॉपेबल संस्थेचे समन्वयक राजेश पुरोहित, शालेय समिती अध्यक्ष रमेश गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कल्पना पवार, संस्था पदाधिकारी प्रसाद मराठे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Balak Mandir School in Kalyan distributed free mobiles to poor children for online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.