लग्नासाठी आग्रह, पण कुटुंबाचा नकार; १९ वर्षीय तरुणाने मानसिक तणावातून डोंबिवलीत स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:03 IST2025-12-02T17:03:44+5:302025-12-02T17:03:44+5:30
कुटुंबियांनी वय पूर्ण होण्याआधीच लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

लग्नासाठी आग्रह, पण कुटुंबाचा नकार; १९ वर्षीय तरुणाने मानसिक तणावातून डोंबिवलीत स्वतःला संपवले
Dombivli Crime: कुटुंबाकडून लग्नाला होकार मिळत नसल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, हा मृत तरुण मूळचा झारखंडचा असून त्याचे कुटुंब डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहे.
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे त्याच्या मूळ गावी असलेल्या एका मुलीवर प्रेम होते आणि त्याला तिच्याशी विवाह करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सध्या लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी २१ वर्षे पूर्ण होण्याची अट असल्याने, कुटुंबाने त्याला कायदेशीर वयापर्यंत थांबण्यास सांगितले. या नकारामुळे तरुण नैराश्यात गेला आणि मानसिक तणावातून त्याने ३० नोव्हेंबर रोजी घरातच स्कार्फच्या सहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.
कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
'आई बाबा मला माफ करा' स्टेटस ठेवून दुसऱ्या तरुणाची आत्महत्या
डोंबिवलीच्या घटनेप्रमाणेच कल्याण परिसरातूनही आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात राहणाऱ्या प्रदीप किसन भोईर (वय ३०) या तरुणाचा मृतदेह शनिवारी रात्री काळा तलावात आढळला. प्रदीप शनिवारी रात्री घरातून बाहेर पडला होता. घराबाहेर पडण्यापूर्वीच त्याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर 'आई बाबा मला माफ करा' असा भावनिक स्टेटस ठेवला होता.
बराच वेळ होऊनही प्रदीप घरी न परतल्याने आणि त्याच्या मोठ्या भावाने व्हॉट्सॲप स्टेटस पाहिल्यावर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रदीप भोईर याचा मृतदेह अखेर काळा तलावात आढळला. भोईर कुटुंब मूळचे मुरबाड तालुक्यातील शेलारी गावचे रहिवासी आहे. प्रदीपने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.