Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय?

By स्वदेश घाणेकर | Published: August 20, 2018 04:38 PM2018-08-20T16:38:08+5:302018-08-20T16:58:33+5:30

Asian Games 2018: भारतीय पुरूष कबड्डी संघाला सोमवारी दक्षिण कोरियाने जमिनीवर आणले. कबड्डी ही आता केवळ भारताची मक्तेदारी राहिलेली नाही, याची जाणीव करून देणारा हा सामना ठरला. 

Asian Games 2018: what about Indian kabaddi 'Progress'? | Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय?

Asian Games 2018: कबड्डी 'प्रो' झाली, पण 'प्रोग्रेस'चं काय?

googlenewsNext

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक म्हणजे आपल्या घरचीच मक्तेदारी... त्यामुळे येथे आमचेच राज्य चालणार... आम्हाला हरवणे सोडा, त्याच्या आसपासही कोणी पोहचू शकत नाही... या रंजक स्वप्नांसह हवेत तरंगत असलेल्या भारतीय पुरूष कबड्डी संघाला सोमवारी दक्षिण कोरियाने जमिनीवर आणले. कबड्डी ही आता केवळ भारताची मक्तेदारी राहिलेली नाही, याची जाणीव करून देणारा हा सामना ठरला. 

( Asian Games 2018: भारताचा कबड्डीमध्ये फक्त एका गुणाने पराभव )

कोरियाने 24-23 अशा अवघ्या एका गुणाच्या फरकाने विजय मिळवला. भारतीय खेळाडूंचे दोष दाखवून कोरिया संघाचे कौतुक हिरावून घ्यायचे नाही. पण, या पराभवानंतर तरी भारतीय खेळाडूंनी भानावर यायला हवं. खरं तर या संभाव्य धोक्याची जाणीव भारताला 2014च्या इंचाँन आशियाई स्पर्धेत यायला हवी होती. सुवर्णपदकाच्या त्या लढतीत इराणने विजयासाठी कडवी टक्कर दिली होती. भारताला (27-25) अवघ्या दोन गुणांच्या फरकाने कसेबसे जेतेपद राखता आले होते.

त्यानंतर भारताने संघबांधणीवर अधिक भर द्यायला हवा होता. पण, तसे झाले नाही. त्यांनी सर्व लक्ष 2014 पासूनच सुरू झालेल्या 'प्रो कबड्डी'भोवती केंद्रित केले. अल्पावधीतच या लीगने घराघरात प्रवेश केला आणि कबड्डीला एक मोठी उंची मिळवून दिली. पण, ही उंची मिळवताना भारतीय संघाच्या होणाऱ्या नुकसानीकडे दुर्लक्ष झाले. सुरुवातीला एका हंगामापूरती होणारी ही लीग मागील वर्षी दोन हंगामात खेळवण्यात आली. त्यामुळे दुखापतींचे प्रमाणही वाढले. 

संघ संख्या वाढली आणि त्यामुळे अन्य देशातील खेळाडूंना भारतीय कबड्डीचा बारकाईने अभ्यास करण्याचे व्यासपीठ मिळू लागले. दीड महिन्यांच्या या सहवासात परदेशातील खेळाडू भारतीय शैलीबद्दल पुरेपूर माहिती गोळा करण्यात प्रयत्नशील राहिले, तर भारतीय खेळाडू चंदेरी दुनियेत मश्गुल झालेले दिसले. प्रसिद्धीच्या झगमगाटाचा आस्वाद घेण्यात काहीच चूक नाही, परंतु त्यात स्वतःला हरवून बसणे, हे वाईट. 

आशियाई स्पर्धेचा सुवर्ण इतिहास बाजूने असल्याने जकार्तात भारतीय खेळाडू अतिआत्मविश्वासाने दाखल झाले. त्यांचा हा फुगा सोमवारी कोरियाने फोडला. तो फोडण्यासाठी आघाडीवर होता तो जँग कून ली... याच जँग कूनला प्रो कबड्डीमध्ये आपण सर्वांना डोक्यावर घेतले आणि त्यानेच सुरेख खेळ करताना भारताला पराभवाची चव चाखवली. 

1990 पासून आशियाई स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने सात सुवर्णपदकं जिंकली. पण, 37 सामने अपराजित राहिलेल्या भारतीय संघाची विजयी मालिका खंडित झाली. 2014च्या आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या कोरियाकडून झालेल्या या पराभवातून भारतीय संघ काहीतरी बोध घेईल अशी अपेक्षा आहे. कबड्डी 'प्रो' झाली, पण भारतीय संघाच्या 'प्रोग्रेस'चं काय? हा प्रश्न मनात घर करू नये ही आशा. 

  • 1990 मध्ये भारतीय पुरूष संघाने बांगलादेशला नमवून पहिले सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे 1990च्या आशियाई स्पर्धेतील भारताचे ते एकमेव सुवर्णपदक होते.
  • भारतीय संघाने प्रत्येक आशियाई स्पर्धेत कबड्डीचे सुवर्ण नावावर कायम राखले आहे. भारताने 1990, 1994, 1998, 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये बाजी मारली
  • भारताने 1998 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 76-13 असा विजय मिळवला होता आणि आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक गुणांनी (63) मिळवलेला विजय आहे.

Web Title: Asian Games 2018: what about Indian kabaddi 'Progress'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.