Wife feared cockroach husband wants divorce in Bhopal Madhya Pradesh | बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट!

बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट!

नेहमीच जगभरातून घटस्फोटाची अशी विचित्र कारणे समोर येत असतात की, विश्वास बसत नाही. असंच एक घटस्फोटाच विचित्र आणि हसू येणारं कारण मध्य प्रदेशच्या भोपाळमधून समोर आलं आहे. झुरळाची भीती बऱ्याच लोकांना वाटत असते.  मात्र, हेच झुरळ एका कपलच्या घटस्फोटाचं कारण ठरत आहे. 

पत्नी झुरळाला घाबरते म्हणून इथे एका पतीला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे. महिलेला झुरळाची भीती वाटत असल्याने या कपलने तीन वर्षात १८ घरे बदलली आहेत. मात्र, परिस्थिती बदलत नसल्याचे पाहून आता पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे. 

काय आहे प्रकरण?

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरूणाचं नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न झालं होतं. सुरूवातीला तर सगळं काही ठीक होतं. पण काही महिन्यांनंतर एक दिवस पत्नीने किचनमध्ये झुरळ पाहिलं. ती इतक्या जोरात ओरडली की, घरातील लोक घाबरले. यानंतर पत्नीने घर बदलण्याचा हट्ट सुरू केला. त्यांनी घर तर बदललं पण पत्नीला झुरळाची वाटणारी भीती काही कमी नाही. अशाप्रकारे या कपलने झुरळामुळे ३ वर्षात तब्बल १८ घरे बदलली. पतीचा आरोप आहे की, पत्नीच्या या भीतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागत आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, तरूणाने आपल्या पत्नीला अनेक मानसोपचार तज्ज्ञांनाही दाखवलं. मात्र, पत्नी काही औषधं खायला तयार नाही. पत्नीचा आरोप आहे की, तिची समस्या समजून घेतली जात नाहीये आणि तिला पागल घोषित करण्याचा प्रयत्न होत आहे.

पतीने पत्नीच्या या भीतीला वैतागून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. ज्यानंतर हे प्रकरण भाई वेलफेअर सोसायटीमध्ये गेलं. सोसायटीच्या लोकांनी सांगितले की, हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही. सध्या कपलची काउन्सेलिंग केली जात आहे. 
 

Web Title: Wife feared cockroach husband wants divorce in Bhopal Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.