'तो' अगदीच बिनकामाचा, तरीही कमावतोय बक्कळ पैसा; हजारो लोकांना वाटतोय हवाहवासा 

By कुणाल गवाणकर | Published: January 20, 2021 12:58 PM2021-01-20T12:58:10+5:302021-01-20T12:59:21+5:30

दररोज ३-४ जणांना देतो सेवा; काहीच न करताही चांगली कमाई

Japanese man rents himself to do nothing gets thousands of clients | 'तो' अगदीच बिनकामाचा, तरीही कमावतोय बक्कळ पैसा; हजारो लोकांना वाटतोय हवाहवासा 

'तो' अगदीच बिनकामाचा, तरीही कमावतोय बक्कळ पैसा; हजारो लोकांना वाटतोय हवाहवासा 

Next

टोकियो: आयुष्यात काहीतरी करायचं, करून दाखवायचं, असं अनेकांना वाटतं. अरे तू काहीच करत नाहीस. तुला काहीच जमत नाही. कसं होणार तुझं? असे प्रश्न काहीच न करणाऱ्यांना विचारले जातात. पोट भरण्यासाठी, घर चालवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. मात्र कोणतंही काम न करता कोणीतरी दररोज हजारो रुपये कमावतोय आणि त्याच्या सेवेला खूप मोठी मागणी आहे, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडतंय.

जपानचे रहिवासी असलेले शोजी मोरिमोटो यांचं वय ३७ वर्षे आहे. शोजी काहीच करत नाहीत. मात्र त्याबद्दल्यात ते १० हजार येन आकारतात. शोजी यांचे हजारो ग्राहक आहेत आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखाच्या घरात आहे. टोकियोमध्ये वास्तव्यात असलेल्या शोजी यांची सेवा कुणीही घेऊ शकतं. शोजी त्यांची सेवा घेणाऱ्या व्यक्तीसोबत राहतात, खातात, पितात, त्याचं ऐकून घेतात आणि प्रतिसाद देतात.

शोजी यांनी २०१८ पासून 'काहीच न करण्याची' सेवा सुरू केली. 'मी स्वत:ला भाड्यानं उपलब्ध करून देतोय. मी काहीच करत नाही. तुम्हाला दुकानात एकटं जायला कंटाळा येतो का? तुमच्या टीममध्ये एक खेळाडू कमी आहे का? मी अशा सोप्या गोष्टींशिवाय तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही.' असं ट्विट शोजी यांनी दोन वर्षांपूर्वी केलं होतं. सुरुवातीला त्यांची सेवा मोफत होती. त्यानंतर अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शोजी यांच्या ट्विटला मिळालेला प्रतिसाद अतिशय मोठा होता. त्यामुळेच मग त्यांनी यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

सध्याच्या घडीला शोजी दर दिवशी तीन-चार ग्राहकांना सेवा देतात. आतापर्यंत त्यांनी ३ हजार जणांना सेवा दिली आहे. ग्राहक विविध कारणांसाठी शोजी यांची सेवा घेतात. काहींना एकांतवासाचा कंटाळा येतो. तर काहींना आपलं कोणीतरी ऐकावं असं वाटतं. अशा व्यक्तींसोबत शोजी राहतात. ते त्यांच्या ग्राहकांसोबत जेवायला जातात. त्यांचे फोटो काढतात. कोणी घटस्फोट घेत असेल, तर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्या व्यक्तीसोबत असतात. कामाचा ताण असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतात.

'मी कोणाचाही मित्र किंवा नातेवाईक नाही. नातेसंबंधांमुळे येणारे ताण-तणाव माझ्या आयुष्यात नाहीत. पण अशा प्रकारचे तणाव, समस्या इतरांच्या आयुष्यात आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांना एकटं वाटतं. त्यांच्या अडचणी, भावनिक समस्या ऐकून घेण्याचं काम मी करतो. त्यामुळे लोकांना हलकं वाटतं. आपलं कोणीतरी ऐकून घेतंय ही भावना त्यांना महत्त्वाची वाटते,' असं शोजी यांनी सांगितलं.
 

Web Title: Japanese man rents himself to do nothing gets thousands of clients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.