Infant girl found alive in cremation site Pit in Uttar Pradesh | मृत मुलीला दफन करण्यासाठी गेलेल्या पित्याला स्मशानातील खड्ड्यात सापडले अनमोल रत्न...  
मृत मुलीला दफन करण्यासाठी गेलेल्या पित्याला स्मशानातील खड्ड्यात सापडले अनमोल रत्न...  

बरेली (उत्तर प्रदेश) - घेणाराही तोच आणि देणाराही तोच, या उक्तीचा प्रत्यय उत्तर प्रदेशमधील एका पित्याला नुकताच आला. काही वेळापूर्वीच जन्मलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने ही व्यक्ती तिचा मृतदेह दफन करण्यासाठी स्मशानात घेऊन गेली. मात्र तिथे खड्डा खोदत असताना त्यांना आत जे काही सापडले त्याबाबत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.   

स्मशानात गेल्यावर मृत मुलीचे दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू झाले. तेवढ्यात खड्डा खोदत असताना तेथील कामगारांना त्यात एक हंडा सापडला. धक्कादायक बाब म्हणजे या हंड्यात जिवंत पुरलेली मुलगी सापडली. दरम्यान, पोटची लेक गेली असताना या मुलीच्या रूपात देवानेच आपल्याला हे कन्यारत्न भेट दिले, असे समजून सदर व्यक्तीने या मुलीचा स्वीकार केला. ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात घडली. 

या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितले की, 'बरेली शहरातील सीबीगंज येथील वेस्टर्न कॉलनी येथील रहिवासी हितेश कुमार सिरोही यांच्या घरी गुरुवारी एका मुलीचा जन्म झाला होता. मात्र या नवजात मुलीचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांसह तिचे वडील अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. तिथे तिचा मृतदेह पुरण्यासाठी त्यांनी सुमारे तीन फूट खोल खड्डा खणला. त्यादरम्यान खड्डा खोदत असलेल्या कामगाराच्या फावड्याला एक हंडा लागला. हा हंडा बाहेर काढला असताना त्यात एक जिवंत नवजात मुलगी सापडली. बराच वेळ जमिनीखाली राहिल्याने तिचे श्वसन वेगात सुरू होते. दरम्यान, हितेश याने या मुलीचा स्वीकार केला.'' 

सध्या या मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या मुलीला स्मशानात कुणी जिवंत पुरले याचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र पांडे यांनी सांगितले. 
 

Web Title: Infant girl found alive in cremation site Pit in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.