एकाच दिवसात २८ लाख लिटर बिअरचा फन्ना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:04 AM2021-04-23T05:04:29+5:302021-04-23T05:04:39+5:30

लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्याचा आणि घराबाहेर पडायला मिळाल्याचा किती आनंद लोकांनी साजरा करावा? इंग्लंडमध्ये गेल्या शनिवारी सुपर सॅटर्डे नाईट होती. यावेळी किती लोकांनी बाहेर पडावं आणि पब्ज, बिअर-बारचा आनंद घ्यावा?

Fanna of 2.8 million liters of beer in a single day! | एकाच दिवसात २८ लाख लिटर बिअरचा फन्ना!

एकाच दिवसात २८ लाख लिटर बिअरचा फन्ना!

Next

शतकातून एखादीच अशी महामारी येते, ज्याने संपूर्ण जग उद्ध्वस्त होतं. अर्थव्यवस्था रसातळाला जाते, लाखो लोक मृत्युमुखी पडतात. कोरोनाच्या रूपानं अशीच महामारी सध्या सगळं जग अनुभवतं आहे. कोरोनाचा कहर केव्हा एकदा संपेल असं संपूर्ण जगाला झालेलं असताना, लसीकरण सुरू होऊनही त्याचा प्रकोप वाढतोच आहे. काही ठिकाणी कोरोनाचा दुसरा, तिसरा टप्पाही सुरू झाला आहे, त्यामुळे सगळं जग पुन्हा एकदा हवालदिल झालं आहे. मात्र त्याचवेळी काही ठिकाणी कोरोनाची तीव्रता कमीही होते आहे. निदान तिथलं सरकार तरी तसं सांगतं आहे. कोरोना आटोक्यात येत असलेला असाच एक देश म्हणजे ब्रिटन. गेल्या काही दिवसांत तेथील कोरोनाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाल्याचं निदर्शनास येतं आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही लॉकडाऊनमध्ये आता बऱ्यापैकी सूट द्यायला सुरूवात केली आहे. उद्योगधंदे, लोकांवरची बंधनं सैल केली आहेत. त्यामुळे गेलं वर्षभर साखळदंडात अडकून पडलेल्या लोकांनाही हायसं वाटलं आहे आणि केव्हा आपण एकदा घराबाहेर पडून मोकळा श्वास घेतो, मौजमजा करतो असं  झालं आहे. लाॅकडाऊनमध्ये सूट मिळाल्याचा फायदा घेऊन ब्रिटिश लोक आता हॉटेल्स, पब्ज, बार्स.. येथे जायला लागले आहेत. घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे याठिकाणची गर्दी पुन्हा एकदा वाढू लागली आहे आणि सर्वत्र चहलपहल दिसू लागली आहे. 


लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्याचा आणि घराबाहेर पडायला मिळाल्याचा किती आनंद लोकांनी साजरा करावा? इंग्लंडमध्ये गेल्या शनिवारी सुपर सॅटर्डे नाईट होती. यावेळी किती लोकांनी बाहेर पडावं आणि पब्ज, बिअर-बारचा आनंद घ्यावा?
या एकाच दिवशी इंग्लंडमध्ये तब्बल तीस लाखापेक्षाही जास्त लोक घराबाहेर पडले आणि इंग्लंडमधील सुमारे ५० हजार रेस्टॉरंट‌्स लोकांच्या गर्दीनं अक्षरश: वाहू लागली. तुडुंब भरली. लोकांना बसायलाही जागा मिळेना, ठिकठिकाणी अक्षरश: रांगा लागल्या ! एकाच दिवशी लाखो लोक अचानक बाहेर निघाल्यावर आणि पब्ज, बिअर-बार्सचा रस्ता त्यांनी धरल्यावर जे व्हायचं होतं, तेच झालं. या सगळ्या ठिकाणी दारुचा अक्षरश: महापूर आला. लॉकडाऊन उघडल्याच्या आनंदात लोकांनी किती दारू प्यावी? इंग्लंडमध्ये या एकाच दिवसात सहा मिलिअन पॉईंट‌्स म्हणजेच तब्बल २८ लाख लिटर बिअरचा लोकांनी फन्ना केला ! अनेक पब्ज, रेस्टॉरंटस् मधली बिअर संपली. त्यामुळे तर लोकांच्या संतापाचा पारा आणखी चढला. काही जणांना दारुच न मिळाल्यानं आणि काही जणांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी दारू मिळाल्यानं,हंगामाही झाल्याचं पाहायला मिळालं.


अर्थातच या घटनेला आणखी एक उदास छटाही होती.  शनिवारी ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, राजघराण्यातील अनेक लोक शोकसागरात बुडाले होते, त्याचवेळी इंग्लंडमधील नागरिक रस्यावर उतरून मौजमजा करीत होते, दारु, बिअर पित होते. हा अतिशय वेदनादायी आणि कधीच न विसरता येणारा विरोधाभास होता, असंही अनेकांनी बोलून दाखवलं. त्याचवेळी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असली, तरी कोरोना अजून संपलेला नसल्यामुळे, सरकारनं लगेच लॉकडाऊनवरील बंधनं शिथिल केल्यामुळे, लोकांना फिरायला मोकळीक दिल्यामुळे ब्रिटनच्या सरकारवर आपल्याच लोकांकडून मोठी टीकाही होत आहे. इतर अनेक देशांत कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असताना त्यांनी परत लॉकडाऊन सुरू केलं असताना इंग्लंडनं लॉकडाऊनची बंधनं सैल केल्यानं हा आपल्याच पायावर मारून घेतलेला मोठा धोंडा आहे, अशी टीका इंग्लंडवर होत आहे. अर्थात त्यात देशातील लोकच जास्त आघाडीवर आहेत.
लोक घराबाहेर पडू लागल्यानं, व्यावसायिकांमध्ये  मात्र आनंदाची लहर आहे. या नुकसानीतून बाहेर पडायला अजून काही वर्षं जातील असा अनेकांचा अंदाज होता, पण लोकांनी एकाच दिवसात तो फोल ठरवला. रेस्टॉरंट आणि पब मालक, संचालकांचं तर म्हणणं आहे, ‘असंच जर सगळं व्यवस्थित’ सुरू राहिलं, तर कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आम्हा व्यावसायिकांचं जे नुकसान झालं, ते भरून निघायला फार काळ लागणार नाही!

संसर्ग कमी होत असल्याने आनंद!
इंग्लंडमधील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होतो आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या सर्वेक्षणानुसार सप्टेंबर २०२०पासून काेरोनाचा संसर्ग दर आतापर्यंत सर्वांत कमी नोंदवला गेलेला आहे. १० एप्रिल २०२१ पर्यंतच्या आठवड्यात इंग्लंडमध्ये अंदाजे ४८० लोकांमागे एकाला कोरोनाची लागण होती. त्याच्या आधीच्या आठवड्यात मात्र कोरोनाचा हाच दर ३४० लोकांमागे एक रुग्ण असा होता. स्कॉटलंड, नाॅर्दर्न आयर्लंड आणि वेल्स येथे काेरोनाचा हाच दर अनुक्रमे पाचशे लोकांमागे एक रुग्ण, ७१० लोकांमागे एक रुग्ण आणि ९२० लोकांमागे एक रुग्ण असा होता. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे इंग्लंडमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Web Title: Fanna of 2.8 million liters of beer in a single day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.