vidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:34 PM2019-09-22T12:34:27+5:302019-09-22T12:35:24+5:30

उमेदवारांसह प्रशासनही टाळणार प्लॅस्टिकचा वापर, निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

This year's assembly election is plastic-free - Collector | vidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त - जिल्हाधिकारी

vidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त - जिल्हाधिकारी

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांनी निवडणूक प्रचारात प्लॅस्टिक साहित्याचा वापर करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले असून प्रशासनही निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्लॅस्टिक साहित्याचा वापर करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार आंनद कळसकर उपस्थित होते.
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करणार
आचारसंहिता लागू झाली असल्याने विधानसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आचारसंहिता पथके तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करणार
प्रत्येक तालुक्यात दोन वाहनांद्वारे जगजागृती केली जात असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
४ हजार ८८२ व्हीव्ही पॅट
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १७ लाख ९६ हजार ३२६ तर स्त्री मतदार १६ लाख ५० हजार ७२९ व इतर ९३ असे एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ मतदार आहेत. तसेच ११ विधानसभा मतदार संघात एकूण ७ हजार ८४६ सैनिक मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार ८५२ असून जिल्ह्यात एकूण ३ हजार ५३२ मतदान केंद्र आहेत. त्यात सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या ५४ असे एकूण ३ हजार ५८६ मतदान केंद्र आहेत. मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ६ हजार ५१३ मतदान यंत्र तर ४ हजार ४३० कंट्रोल युनिट तर ४ हजार ८८२ व्हीव्ही पॅट यंत्रे निवडणुकासाठी उपलब्ध आहेत.
२७ सप्टेंबर रोजी अधिसूचना
२७ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. ५ आॅक्टोबर रोजी दाखल अर्जांची छाननी होणार आहे तर ७ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. २७ आॅक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
यासाठी संपूर्ण प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कक्ष प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचीही माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.
अ‍ॅपद्वारे करा थेट तक्रार
१९५० या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर मतदारांना निवडणुकीविषयी माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सुविधा, सी-व्हिजिल, सुगम या मोबाईल अ‍ॅपचाही वापर करण्यात येणार आहे. यातील सी-व्हिजिल या अ‍ॅपद्वारे आपल्या मोबाईलवरून पैसे वाटप, इतर गैर अनुचित प्रकारांबाबत थेट तक्रार करण्यात येणार आहे. त्यात त्या ठिकाणचे छायाचित्रही यावर अपलोड करता येणार असून त्याद्वारे प्रशासनाची खात्री पटू शकणार आहे.
११ निवडणूक निर्णय अधिकारी तर ३३ सहायक अधिकारी
निवडणुक कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्य बळ पुरेसे उपलब्ध आहेत. त्यांच्या नियुक्तीही करण्यात आल्या असून त्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. ११ मतदार संघासाठी ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तर ३३ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षकांची अद्याप नियुक्ती नाही
जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी अद्याप निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती झालेली नसून ती लवकरच निवडणूक आयोगाकडून होईल व ्यांनतर त्यांचे नावे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
मतमोजणी केंद्रांचा लवकरच निर्णय
जिल्ह्यातील ११ मतदार संघातील मतमोजणी त्या-त्या मतदार संघातच होणार असून मतमोजणी केंद्र लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. मतदान यंत्रांची संपूर्ण तपासणी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
२४ तासाच वाहने जमा करा
आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील पदाधिकाºयांचे शासकीय वाहने २४ तासाच जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच राजकीय फलकही काढण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
३६ क्रिटीकल मतदान केंद्र
जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रामध्ये ३६ क्रिटीकल मतदान केंद्र असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान ३६० ठिकाणी वेब कास्टिंग होणार असून प्रक्रियेदरम्यानच्या वाहनांवर जीपीएस प्रणाली राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
प्रत्येक मतदार संघात सखी व आदर्श मतदान केंद्र
जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघामध्ये एक सखी मतदान केंद्र व एक आदर्श मतदान केंद्र राहणार आहे. ही किमान संख्या असून त्या पेक्षा जास्त संख्या वाढविण्यावर भर राहणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
सीमावर्ती भागात सात चेकपोस्ट
मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. निवडणुकीत बाधा आणणाºया व्यक्तींची यादी पोलीस ठाणेनिहास तयार असल्याचेही डॉ. उगले म्हणाले. गुन्हेगारांना पाठबळ देण्याºयांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी असलेल्या समाजकंटकांची यादी तयार असून त्या व्यतिरिक्त या चार-पाच महिन्याच्या काळातील गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात काही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यासह इतर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सात चेकपोस्ट राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. उगले म्हणाले.

Web Title: This year's assembly election is plastic-free - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव