वहीवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:08 AM2019-12-10T00:08:08+5:302019-12-10T00:08:34+5:30

वहीवाट हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध संदर्भांनी वापरला जातो. याच ‘वहीवाटे’विषयी खास शैलीत लिहिताहेत तावडी बोली भाषेचे अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी.

Wahiwat | वहीवाट

वहीवाट

Next

वहीवाट हा ग्रामीण भागातला परवलीचा शब्द होता़ अनेक अर्थानी हा शब्द महत्त्वाचा होता़ अर्थाच्या अनेक छटा आणि कंगोरे त्याला व्हते़ व्यवहारात अनेक वेळा त्याचा वापर व्हायचा. केवळ वापरच नाही तर बखेडे सोडविण्याकामीही त्याचा वापर व्हायचा़ अशावेळी अनेकवेळा हा शब्द कानावर यायचा़ आमुक आमुकची तशानं तशी वहीवाट आहे़ पूर्वापार चालत आलेली ही वहीवाट रोखू नका़ वहीवाट या शब्दाला पूर्वापार, फार जुनी ही खास विशेषणे होती़ त्याचे कारणही तसे व्हते़
पूर्वापार म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली़ फार जुनी. जिचा वापर वाडवडिलांनी केलेला आहे, जिला त्या सर्वांची मान्यता आहे़ म्हणजेच वहीवाट तिला अर्थातच समाजमान्यता व्हती़ सर्वांची सहमती व्हती़ अशा समूह भावनेवर तर गावगाडा चालून व्हता़ ग्रामव्यवस्था टिकून व्हती़
समूह भावनेत एकमेकाचा आदर, एकमेकाला समजून घेणे फार महत्त्वाचे व्हते़ आणि होतेही तसेच एकमेकाला समजून घेण्यात ग्रामीण माणूस अग्रेसर होता़ सामंजस्य त्याला देणगी स्वरूपात मिळालेले असायचे़ अर्थात परंपरेने अशा अनेक गोष्टी व्हत्या, ज्या त्याला वारसा म्हणून मिळालेल्या व्हत्या़ ज्या त्याला सांभाळाव्या लागत व्हत्या़ तशा तर ह्या प्रथा-परंपरा त्याला आभूषणांसारख्या मिरवाव्या वाटत व्हत्या़ होत्याही तशाच त्या अर्थपूर्ण, परिपूर्ण, समंजस्य़
काही प्रथा-परंपरांना तर कायदासदृश्य दर्जा प्राप्त झालेला राहात व्हता़ जगण्याची रीत बनून जात व्हत्या त्या. नियमांचा दर्जा प्राप्त होऊन जात व्हता त्यांना. त्यांचे पालन सहज होऊन जात व्हते़ अंतरिक उर्मीतून हे सारे घडत व्हते़ सगळ्यांनाच त्या हव्याहव्याशा वाटत व्हत्या़ सगळ्यांकडूनच त्या पाळल्या जात व्हत्या़ प्रसंगी काही तंटा-बखेडा उद्भवल्यास समाजाकडूनच त्यांचे संरक्षण केल्या जात व्हते़ न्यायनिवाडा केला जात व्हता़
कशानं काय व्हत्या बरं- अशा परंपरा, ज्यांना वहीवाटींचा दर्जा प्राप्त झालेला व्हता? तर त्या अनेक प्रकारच्या व्हत्या़ वैयक्तिक काही सामाजिक सुद्धा. वैयक्तिक म्हणसाल तर लेकबायचा आदर राखणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा व्हती़ मुलगी, महिला, माय, बहीण यांचा आदर राखला जात व्हता़ मुलीच्या जन्माचे कौतुक केले जात व्हते़ जन्मोत्सव साजरा केला जात व्हता कन्याजन्माचा. आदराने वाढवल्या जात व्हते तिला. कोनत्याही प्रकारे दुखावल्या जात नव्हते़ कपड्यालत्यांची, दागदागिन्यांची हौस पुरवल्या जात व्हती़ साक्षात लक्ष्मीचे रूप, देवीचा अवतार म्हणूनच महिलांकडे पाहिले जात व्हते़ त्याच आदराने वाढवल्या जात व्हते़
लग्न झाल्यावरही महिलांचा आदर कायम राखला जात व्हता़ सासरी गेल्यावरही माहेरातील त्यांची वहिवाट कायम राखली जात व्हती़ अबादीत ठिवल्या जात व्हती़ त्याचे स्वरूप आदराचे व्हते, कौतुकाचे व्हते़ माहेरी आलेल्या माहेरवाशीणीचे कौतुक सगळ्यांनाच असायचे. सगळेच तिचा मानसन्मान राखायचे़ विशेष करून सणासुदीला, आनंदाच्या क्षणाला, मंगल कार्याला त्यांची उपस्थिती माहेरात असायची़ माहेरचा पाहुणचार, माहेरचं कौतुक आणि साडीचोळी ह्यावर तिचा हक्क असायचा़ परंपरेने तशानं तशी वहीवाटच बनून गेलेली. भाऊबीजेचा सण आला म्हणजे भाऊ निघाला बहिणीला आनायला. अशानं आसं व्हतं! हीच वहीवाट पुढे प्रशस्त होऊन जायची़ नात्यांची वीण घट्ट करत जायची. माय-बहिणींचा सगळयांनाच लळा लागायचा़ मुलाबाळांना लळा लागायचा़ त्यांच्या मनात, आदर, माय, ममता उत्पन्न व्हायची़ मामाच्या घराची ओढ लागायची़ सणासुदीला मामाचा गाव जवळ केला जायचा़ सुट्यांची धमालही तिकडेच व्हायची़ मामाचा गाव आपला वाटायचा़ गावभर आपुलकीने स्वागत व्हायचे़ शिवारही आपलसं वाटायच़ं शिवारातला रानमेवाही आपला वाटायचा़ सर्वांवर प्रेमाचा हक्क असायचा. तसा तो प्रस्तापितच होऊन जायचा. एकमेकांच्या खोड्या काढणे, थट्टा करणे, रानावणात फिरणे, मौजमजा करणे हे सारं ओघाने यायचं़ त्याची सवय होऊन जायची़ मामाच्या गावाला जायची वहीवाट पडून जायची़ मामांना भाच्यांची ओढ लागायची़ आपुलकीने पाहुणचार व्हायचा़ कपडेलत्ते घेतले जायचे. सोबत धान्य वगैरे वानोळ्याचे सामानही मिळायचे़ हे सारं सहज- हक्काने होऊन जायचे़ वहीवाटच असायची़
ही वहीवाट नंतर नात्यात रूपांतरित व्हायची़ मामाची मुलगी बायको केली जायची़ त्यातून नात्यांचा विस्तार व्हायचा़ वहीवाट एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यत चालू राहायची़ हा प्रकार फक्त मामा, बहीण यांच्यापुरता मर्यादित असायचा, आसं नव्हतं बरं का! तर आत्या, फूई, माम्या, मावशा यांच्याही बाबतीत लागू असायचा़ त्यांचीही आपल्या भावाकडे, भाच्याकडे, मामाकडे, मावसाकडे, बाबाकडे, आजोबांकडे वहीवाट असायची़... (पूर्वार्ध)
-डॉ.अशोक कौतिक कोळी, जामनेर

Web Title: Wahiwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.