वल्गना मोठ्या; खान्देश उपाशीच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:48 PM2020-02-25T12:48:24+5:302020-02-25T12:49:00+5:30

राज्यकर्त्यांच्या दौऱ्याचा गडगडाट फार; प्रत्यक्षात हाती भोपळा, शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी राज्य चालविताना त्यांना काय दिले?, रखडलेल्या प्रकल्पांविषयी बोलणार कधी आणि कृती होणार कधी?

Vulgana large; Khandesh remained hungry | वल्गना मोठ्या; खान्देश उपाशीच राहिला

वल्गना मोठ्या; खान्देश उपाशीच राहिला

Next

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आठवडाभरात खान्देशचा दौरा केला. दौºयाची चर्चा खूप झाली; पण खान्देश उपाशीच राहिला.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांचा हा पहिला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मुळात सरकार स्थापन होऊन कमी कालावधी झाला असल्याने फार काही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हत्या. परंतु, राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार हे विस्कटलेली घडी बसवतील, असे वाटत होते. जळगाव जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्राची पुरेपूर माहिती असताना त्यांच्याकडून ठोस काही आश्वासने मिळाली नाहीत. शेतकऱ्यांचे कारखाने भाडेतत्त्वावर दिली जाऊ नये, या त्यांच्या विधानाविषयी मतप्रवाह निर्माण होऊ शकतात. सहकार क्षेत्रात अशी स्थिती का निर्माण झाली, त्याला कोण जबाबदार आहेत. आजारी कारखाने कोणी विकत घेतले, ते कोणत्या पक्षाचे आहेत, आणि आता ते कारखाने नफ्यात कसे? हे प्रश्न निश्चित उपस्थित होतात.
ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मेळावा आणि पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला. कोणत्याही निवडणुका नसताना संघटनेवर जोर दिला जात आहे. पण जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित कामांविषयी कोणतीही आढावा बैठक झाली नाही.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही अस्तित्वात असलेल्या कृषी संशोधन केंद्राच्या पुन्हा स्थापनेची मागणी करुन तमाम शेतकºयांना आश्चर्यचकीत केले. तिकडे नंदुरबारात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवस आले. डोनाल्ड ट्रम्प आणि कोश्यारी यांचे दौरे सारखेच. त्यांना केवळ छान छान आणि गोड गोड चित्र दाखवायचे; मूळ प्रश्न, अडचणी यापासून दूर ठेवायचे, असा मामला होता. भगदरी आणि मोलगी येथे मुख्यमंत्री येऊन गेले, राज्यपाल येऊन गेले. त्या दोन्ही गावांमधील शासकीय कार्यालये, योजनांचे फलित म्हणजे संपूर्ण नंदुरबार जिल्हा असा समज राज्यकर्त्यांचा करुन देण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे. त्यात राज्यपाल महोदयांनी स्वत:च्या गावाचे उदाहरण देऊन आजही मी दीड कि.मी. पायी चालत घरी जातो, असे म्हणणे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत भूषणावह बाब आहे काय?
धुळ्यात मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या विषयावरुन खासदार डॉ.सुभाष भामरे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्टÑवादी अनिल गोटे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी केवळ एक हजार रुपयाची तरतूद असल्याचे गोटेंनी उघडकीस आणले. प्रत्युत्तर म्हणून भामरे यांनी सर्वेक्षण सुरु असलेल्या भागातील शेतकºयांना आणून पत्रकार परिषद घेतली. यातून धुळेकरांना एवढे मात्र कळले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी भूमिपूजन केलेल्या या रेल्वे मार्गाविषयी अद्याप जमिनीत खुणा गाडण्याशिवाय काहीही झालेले नाही. महाराष्टÑ व मध्यप्रदेश सरकार व रेल्वे मंत्रालयात करार झालेला नाही. शिपींग मंत्रालयानेदेखील कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही.
ठाकरे आणि पवार शेतकºयांविषयी नेहमी
बोलत असले तरी खान्देशातील केळी, कापूस आणि प्रक्रिया उद्योगाविषयी काहीही ठोस विधान केले गेले नाही. निवडणुका संपल्या; आता सरकारकडून काम हवे आहे. मात्र महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शनाला महत्त्व देण्यात आले. कोणतीही बैठक घेतली गेली नाही. रखडलेल्या प्रकल्पांविषयी चकार कोणी बोलले नाही.

Web Title: Vulgana large; Khandesh remained hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.