जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:00 PM2020-05-21T23:00:48+5:302020-05-21T23:01:01+5:30

वढोदा हे जैवविविधतेने नटलेले वनक्षेत्र आहे.

Vadoda forest area rich in biodiversity | जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र

जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र

googlenewsNext


मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पट्टेदार वाघाचा दोन दशकापासूनचा अधिवास, ग्रामस्थांकडून वाघांचे संवर्धन आणि संगोपन कार्यामुळे खान्देशात मानबिंदू ठरलेले वडोदा वनपरिक्षेत्र जैवविविधता संपन्न वनक्षेत्र बनले आहे. जैवविविधतेसाठी मुबलक अन्नजाळे, अन्नसाखळी, विपूल वनसंपदा, जंगलात पाण्याचे नैसर्गिक कृत्रिम पाणवठ्यासह मुबलक जलसाठा असलेले पूर्णा नदी पात्राचे सानिध्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांमधील जागरूकता
यामुळे वडोदा वनपरिक्षेत्र जैवविविधतेने फुलले आहे.

अगदी पट्टेदार वाघापासून तर दुर्मिळ उद मांजर, रानगवा तर सरपटणारे वन्यजीवांपाठोपाठ आणि मोर व परदेशी पाहुण्या पक्ष्यांचा अधिवास रुपी किलबिलाट येथे लाभतो. वनसंपत्तीत अंजन खैर, धावडा, सलई यासह शतावरी, अडुळसा, रांनझेंडू, रान तुळस या वनौषधी अशा अमूल्य ठेव्याने तब्बल १४ हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या या वनपरिक्षेत्राला नैसर्गिक देण लाभली आहे.
वैविध्यपूर्ण जैवविविधता
वनपरिक्षेत्रात ६ पट्टेदार वाघांचे अधिवास यापूर्वी निष्पन्न झाले आहे. अलीकडे मार्चला एक पट्टेदार वयोवृध्द वाघीण मृत्यू पावली होती तर गेल्या कालखंडात दोन वेगवगळ्या घटनेत एक छावा व एक पट्टेदार वाघ दगावला आहे. अशात २०१९च्या प्राणी गणने दरम्यान दोन पट्टेदार वाघ दिसून आले आहेत. वाघांचा अधिवास कायम असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. प्राणी गणनेत वाघ २, तडस- ४, भेकर- १०७, अस्वल -५ , रानकुत्रं -७ , जंगली मांजर १४ रानडुकरे- ३२०, काळवीट-७५, चितळ ३८२, सांबार -६ मुंगूस १७, भेकर - १०४ कोल्हे- १४, लांडगे-९, नीलगायी- ४१९, चिंकरा- १७, उड मांजर -८, सायाळ- ४, ससे- २४, मोर- ८२, माकडे- १२६ यासह दूर्मिळ पक्षी - ६०, अशा एकूण १ हजार ७०५ वन्यजीवांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यात अनेक दुर्मीळ वन्यजीव डोलारखेडा वनपरिक्षेत्रात आहेत
दुर्मिळ योग
डोलारखेडा ते दुई या सहा कि.मी. अंतरात एक पेक्षा जास्त पट्टेदार वाघ वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत असल्याने वनविभाग ही चक्रावले आहे. व्याघ्र प्रकल्प वगळता पट्टेदार वाघ किमान ५ ते २५ कि.मी. परिघात एकटाच वास्तव्य करतो. अशात या ठिकाणी एकापेक्षा जास्त वाघ दिसून येत असल्याने हा दुर्मिळ प्रकार वनविभागासाठी संशोधनाचा विषय बनला आहे. त्यात भर म्हणून बिबटयाचा ही याच भागात वावर येथे असल्याने वाइल्ड लाइफ संशोधन व अभ्यासाची पर्वणी या वनपरिक्षेत्रात निर्माण झाली आहे.

वाघाच्या संगोपनासाठी सर्व काही

वाघ जगले पाहिजे, त्यांचे संगोपन व्हायला पाहिजे ही शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची भावना कौतुकास्पद आहे. वाघाच्या संगोपनासाठी डोलारखेडा येथील ग्रामस्थांनी चक्क गावाचे व शेती शिवाराचे पुनर्वसन करण्यासाठी दाखविलेली तयारी महाराष्ट्रात वन्य जैवविविधता व संगोपनासाठी दिशादर्शक म्हणावी लागेल. सुकळी शिवारात नाना चव्हाण यांच्या शेतातही वाघिणीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. वाघीण आणि छाव्यांच्या संगोपनासाठी त्या शेतकऱ्याने उभ्या केळी पिकाच्या उत्पन्नावर पाणी सोडले होते. राज्य शासनाकडून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवाला धोका
वन्यजीवांच्या अधिवासाने खुललेल्या या वनक्षेत्रात उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटतात. जंगलातील आतील भागात वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या ठिकाणी एकाच वेळेस विविध प्राणी व त्यांचे झुंड येऊ शकत नाही. परिणामी वन्यप्राणी या जंगलातून गेलेल्या मुक्ताईनगर कुऱ्हा हा मार्ग ओलांडून जंगलाच्या खालच्या बाजूला पाणी पिण्यासाठी पूर्णा नदी पात्रावर येतात. त्याची ही पाण्यासाठीचा राबता येथून रहदारी करणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा धोक्याचा ठरतो. यातून वन्यजीव अपघाताला बळी पडतात. अगदी पट्टेदार वाघाचा छावा अशा अपघातात दगावला आहे.

लॉकडाउन जैव विविधतेसाठी पर्वणी

विस्तिर्ण अशा या वनपरिक्षेत्रात चारठाणा येथे भवानीमाता मंदिर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. जागृत ग्रामस्थांनी कुऱ्हाड बंदी लागू करून हा परिसर वाढवला आहे. पुरातन भवानी माता मंदिर त्याला लागून मोठा तलाव घनदाट जंगल आणि पर्यटनासाठी विकसित केलेला हा परिसर जंगल सफारी घडवितो. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने या जंगलातून जाणारा मुक्ताईनगर कुऱ्हा मार्गावरील वाहनांची वर्दळ नसल्यासारखी आहे तर कोरोना सावट पसरल्याने ग्रामस्थ, पाळीव प्राणी यांचा जंगलातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद आहे. प्रदूषण मुक्त परिसरात मानवी हस्तक्षेप ही नसल्याने जैवविविधता अधिक खुलली आहे. अगदी वन्यजीवांचा मुक्तसंचार दिवसालाही होत आहे.

कुऱ्हा वदोडा वनक्षेत्र हे खान्देश कुशीत बसलेले एक निसर्गसंपन्न असे काश्मीर म्हणावे तसे आहे. कारण असे की विविध प्रकारच्या वनसंपत्तीने हा संपूर्ण परिसर नटलेला आहे. एवढेच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात असंख्य प्राणी, पशु, पक्षी, जमिनीवर सरपटणारे अनेक प्रकारचे निसर्ग घटक येथे दिसतात. भरगच्च
अशा विविध औषधी वनस्पती येथे आढळून येतात. पर्यावरण अभ्यासक वर्गासाठी पर्यावरणाचा घटकांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यासासाठी उपयुक्त असा हा निसर्ग परिसर आहे.
-प्रशांतराज तायडे, पर्यावरण तज्ञ तथा राष्ट्रीय हरित सेना शिक्षक, मुक्ताईनगर.

Web Title: Vadoda forest area rich in biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.