ट्रक उलटून १५ जणांचा जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:38 PM2021-02-15T17:38:10+5:302021-02-15T17:42:12+5:30

चोपड्याकडून यावलकडे पपई व मजुरांना घेऊन येणारी ट्रक उलटून त्या खाली दबल्याने १५ जण ठार झाले.

A truck overturned, killing 15 people on the spot | ट्रक उलटून १५ जणांचा जागीच ठार

ट्रक उलटून १५ जणांचा जागीच ठार

Next
ठळक मुद्देयावलनजीक अपघात मृतांमध्ये १३ मजूर व २ बालकांचा समावेश,  धुळे येथून पपई आणतानाची दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

यावल  : चोपड्याकडून यावलकडे पपई व मजुरांना घेऊन येणारी ट्रक उलटून त्या खाली दबल्याने १५ जण ठार झाले.  यात दोन बालके आणि १३ मजुरांचा समावेश आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना किनगाव-  यावल रस्त्यावर किनगावपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर १४ रोजी मध्यरात्री घडली.  या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले. ट्रकचालक व पपई व्यापारी अशा दोन जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 ट्रक क्र. (एमएच १९-झेड ३६६८) नेर ता.  धुळे येथून पपईभरून रावेरकडे जात असताना मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. घटना घडताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. हा भीषण अपघात पाहून सारे गावच सुन्न झाले. मृत पावलेल्यांमध्ये दोन बालके, पाच तरुण व दोन तरुणींचा समावेश आहे. ट्रक व पपई खाली दबलेले हे मृतदेह काढण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागले. यासाठी क्रेन मागवून ट्रक बाजूला करण्यात आला तसेच पपईचा ढीग हटवत मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी  मयतांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी  एकच गर्दी केली.

मृतांची नावे...
शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (३०, रा. फकिर वाडा, रावेर),  डिंगबर माधव सपकाळे (५५, रा.रावेर),  सरफराज कासम तडवी (३२, रा. केऱ्हाळा, ता. रावेर),  संदीप युवराज भालेराव (२५,)   दुगार्बाई संदीप भालेराव(२०, दोघे रा.विवरा, ता. रावेर), गणेश रमेश मोरे (५), शारदा रमेश मोरे (१५), अशोक जगन वाघ(४०),  सागर अशोक वाघ (३), संगीता अशोक वाघ (३५), सुमनबाई शालिक इंगळे (४५), कमलाबाई रमेश मोरे (४५), सबनूर हुसेन तडवी (५३), नरेद्र वामन वाघ (२५), दिलदार हुसेन तडवी (२०, सर्व रा.आभोडा,ता. रावेर) यांचा समावेश आहे.

मृतांमध्ये १५ पैकी १० जण आभोड्याचे

या अपघातातील मयतांमध्ये आभोडा, ता. रावेर येथील सर्वाधिक दहा जणांचा समावेश असून त्यात वाघ परिवारातील तीन वर्षाच्या बालकासह चार जण आहेत. तसेच विवरा, ता.रावेर येथील पती व पत्नी असे दोघे तर रावेर येथील २, केऱ्हाळा, ता. रावेर येथील एकाचा समावेश आहे.

मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

या भीषण अपघात प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष  महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी सोमवारी दुपारी  घटनास्थळी भेट  दिली.  पत्रकारांना त्यांनी सांगितले की, परिवहन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 
ट्रकचा स्टेअरींग रॉड तुटल्याने  ट्रकवरील चालकाचा  ताबा सुटला आणि  अपघात झाला. मालवाहू ट्रकमध्ये मजुरांची वाहतुक करणे हा गुन्हा असून व्यापारी व चालकांनी मजुरांना ट्रकवर बसवावयास नको होते. युनुस रमजान तडवी रा. केऱ्हाळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पपई व्यापारी अमीनशहा अशपाक शहा (रा. केऱ्हाळा, ता. रावेर)  व ट्रकचालक शेख जाहीर बद्रुद्दीन  रा. रावेर अशा दोन दोघांविरूध्द भादंवि कलम ३०७ प्रमाणे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

बालकांचे मृतदेह काढताना नागरिकांच्याही डोळ्यात अश्रू

किनगावचे पोलीस पाटील सचिन नायदे  व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून त्यांनी यावल पोलीसांना माहिती दिली  अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचे चाके वर होती ट्रकखाली पपई व त्याखाली मजुर अडकले होते. ग्रामस्थांनी तात्काळ क्रेन बोलावून घेतली.  ट्रक उचलून पपयांखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास सुरवात केली. .एकापाठोपाठ मृतदेह काढतांना उपस्थित नागरिकांनाही अश्रू अनावर झाले होते.  ट्रकखाली आईसह  तीन वर्षाचा सागर अशोक वाघ तर गणेश रमेश मोरे  या बालकाचा मृतदेह पाहून उपस्थितांनी अश्रूंना वाट करुन दिली.

राष्ट्रपती व पंतप्रधान यांना दु:ख  

दरम्यान, या दुर्देवी घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. 

मृतांच्या कुटुंबीयांना मदत 

दरम्यान,  या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख  रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

Web Title: A truck overturned, killing 15 people on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.